• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांची भेट

ByMirror

Jan 2, 2023

कोरोनामध्ये लंगर सेवेने दातृत्व व माणुसकीचा भावना जागवली -खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व कोरोनानंतर देखील अविरतपणे गरजूंना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी भेट दिली. नवीन वर्षात खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांनी या सामाजिक उपक्रमाला भेट देऊन गरजूंना जेवणाच्या पाकिटचे वितरण केले.


यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, डॉ. संजय असणानी, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, गुलशन कंत्रोड, राजू जग्गी, प्रशांत मूनोत, मनोज मदान, कैलाश नवलानी, दलजीतसिंह वधवा, गुलशन खन्ना आदी उपस्थित होते.


लंगर सेवेच्या वतीने जनक आहुजा, डॉ. संजय असणानी व प्रितपालसिंह धुप्पड यांनी खासदार विखे व माजी मंत्री कर्डिले यांचा सत्कार केला. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी प्रास्ताविकात लंगर सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात अन्नाचे पाकिट गरजूंना पुरविण्याचे कार्य सुरु होते. लाखो गरजूंना या सेवेचा लाभ घेतला. कोरोनानंतर तारकपूरला अन्न छत्र सुरु करण्यात आले असून, तारकपूर बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय व इतर विविध खासगी हॉस्पिटल या भागात असल्याने अनेकांना या अन्नछत्राचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.


खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, कोरोनामध्ये लंगर सेवेने दातृत्व व माणुसकीचा भावना जागवली. अनेक गरजूंना या लंगर सेवेने आधार दिले. अन्नदान पर्यंत मर्यादित न राहता जनावरांना चारा तर गरजू विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी मोबाईल व रुग्णांना ऑक्सिजन देखील उपलब्ध करुन देण्यात आले. या सेवेने व्यापक स्वरुप प्राप्त झाले असून, आजही सेवा सुरुच असल्याचे त्यांनी कौतुक केले.

शिवाजी कर्डिले यांनी दातृत्व भावनेतून उभी राहिलेली सेवा प्रेरणादायी आहे. कोरोनात ओरबडण्याची वृत्ती वाढली असताना लंगर सेवेने निस्वार्थपणे देण्याची भूमिका बजावून समाजाला एक वेगळा संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. तर नवीन वर्षातही ही सेवा अविरतपणे सुरु राहण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *