• Wed. Mar 26th, 2025

निमगाव वाघात काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

ByMirror

Apr 12, 2022

कन्या वाचवा ही संतांची शिकवण -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांच्या काल्याचे किर्तनाने झाली. नवनाथ मंदिरात भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या दहा दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे म्हणाले की, भगवंतांच्या लिलेचे भक्तांनी अनुकरण न करता, त्यांच्या उपदेश व विचाराने जीवन व्यतीत करावे. भारतीय संस्कृती सर्व श्रेष्ठ असून, पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा त्यावर पडत आहे. पाश्‍चात्य देश फक्त फिरण्यासाठी चांगले असून, राहण्यासाठी नाही. मुलींनी आपल्या संस्कृतीचा अभिमान ठेऊन समाजात वावरावे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी संतांनी देखील काम केले असून, कन्या वाचवा ही संतांची शिकवण आहे. समाजाने जागृक होऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जातीभेदावर ज्ञानोबांचा दाखला देत त्यांनी समता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. तर श्रीकृष्ण लिलेचे आपल्या वाणीतून निरुपम केले.


किर्तनाच्या समारोपनंतर घुगे महाराज यांचा उपस्थित ग्रामस्थांनी पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. सप्ताहाचे हे पस्तीसावे वर्ष होते. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, सरपंच रुपाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, भागचंद जाधव, सुनिल जाधव, भरत बोडखे, राम जाधव, श्याम जाधव, गोरख चौरे, नामदेव फलके, उद्योजक बाळासाहेब शहाणे, ह.भ.प. गिते महाराज, भाऊसाहेब जाधव, कोंडीभाऊ फलके, डॉ. विजय जाधव, अतुल फलके, किशोर बोडखे, बाळू फलके, गोरख फलके, विठ्ठल फलके, चंद्रकांत जाधव आदी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताहनिमित्त दहा दिवस पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण, हरीपाठ व किर्तनाने गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले. काल्याच्या किर्तनाच्या समारोपनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास भाऊसाहेब कोतकर, अ‍ॅड. बाळासाहेब कर्डिले, दत्तात्रय वाळके आदींनी भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *