महिलांसाठी स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- धकाधकीच्या जीवनात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना, स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका महिलेवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. या युगात जिच्या हाती आरोग्याची दोरी, ती जग उध्दारी.. असे म्हणने वावगे ठरणार नसल्याचे प्रतिपादन अॅड. ममता नंदनवार यांनी केले.
महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अॅड. नंदनवार बोलत होत्या. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सारिका झरेकर, डॉ. दत्तात्रय अन्दुरे, डॉ. तेजश्री जुनागडे, डॉ. मीरा बडवे, डॉ. विनोद गाडेकर, गीता देशमुख, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार विपुल शहा, सचिव सुनील छाजेड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. नंदनवार म्हणाल्या की, सोशल मिडीयामुळे युवती कमी वयातच गरोदर होण्याचे प्रमाण वाढले आहे. सैराटपणामुळे युवतींची जीवन उध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला डॉक्टरांनी आरोग्यासह या बाजूने देखील युवतींचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले.
शिबीराचे उद्घाटन धन्वंतरी पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. मीरा बडवे यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा-मुलगी मध्ये समानता निर्माण होण्याची गरज आहे. मुलगी झाल्यावर मुलगा झाल्याप्रमाणेच आनंद झाला पाहिजे. आरोग्य व इतर गोष्टींबाबत महिलाच अज्ञानामुळे गैरसमज पसरवित असतात. महिलांनी एकमेकींमध्ये गैरसमज न पसरविता योग्य मार्गदर्शन व विचार देण्याची गरज आहे. यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मुलींना मुलांप्रमाणे समान संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करून आपले कर्तृत्व सिद्ध करणार असून, यासाठी मुलींना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी आवाहन केले.
डॉ. सारिका झरेकर म्हणाल्या की, महिलांमध्ये कमी वयात स्तन कॅन्सर व गर्भपिशवीच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. हे आजार एक वर्षाच्या औषधोपचारानंतर बरे होतात. यासाठी वेळेवर निदान व उपचार आवश्यक आहे. चाळीस वर्षानंतर सर्व महिलांनी या तपासण्या करणे गरजेचे आहे. पूर्वी हे कॅन्सर 45 वर्षाच्या वरील महिलांना होत होते, सध्या हे आजार 25 वर्षापुढील महिलांमध्ये आढळत आहे. यासाठी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून वेळेवर तपासण्या करण्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दत्तात्रय अन्दुरे म्हणाले की, सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. यासाठी महिलांनी मोठा संघर्ष करून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. कॅन्सर म्हणजे जगातून माणूस कॅन्सल हा गैरसमज चुकीचा आहे. वेळेवर उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. यासाठी धैर्याने या आजाराला तोंड देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. तेजश्री जुनागडे यांनी कॅन्सर हा पाच टक्के अनुवंशिक असून, इतर कॅन्सरचे वेगवेगळे कारण असू शकतात. शरीरात काही बदल जाणवल्यास तज्ञ व्यक्तींकडून तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विनोद गाडेकर म्हणाले की, व्यसनामुळे युवकांमध्ये कॅन्सर वाढत आहे. युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम भोगावे लागत असून, ही बाब समजेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. व्यसनमुक्तीसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गीता देशमुख यांनी समाजामध्ये कॅन्सरची आजही मोठी दहशत आहे. डॉक्टरांनी कॅन्सर बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रिती शहा, भावना छाजेड, डॉ. सिमरन वधवा, डॉ. सुपेकर, डॉ. अंजू घुले, डॉ. सुधीर लांडगे, हरजितसिंह वधवा, आनंद बोरा, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, जस्मित वधवा, डॉ. संदीप शिंदे, सहेजकौर वधवा आदी उपस्थित होते. हे शिबीर दि.13 मार्च पर्यंत चालणार असून, यामध्ये हिमोग्लोबिन, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा, स्तन कॅन्सर, गर्भाशय पिशवीचा कॅन्सरबाबत तपासणी करुन रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. तर कॅन्सरबद्दल जनजागृती केली जाणार आहे. या आजाराशी निगडीत काही काही तपासण्या मोफत तर काही खर्चिक तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोरा यांनी केले. आभार डॉ. सिमरन वधवा यांनी मानले.