जनकल्याण रक्तकेंद्राकडून सन्मान; रक्तदान शिबिरातून ग्रुपची सामाजिक बांधिलकी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपला जनकल्याण रक्तकेंद्राच्या वतीने “रक्तदान शिबिर संयोजक गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत शिबिर राबविल्याबद्दल ग्रुपच्या कार्याची दखल घेण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ग्रुपच्या सदस्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री, उपाध्यक्ष संतोष डुंगरवाल, कार्यवाह सतीश इंदानी, सहकार्यवाह आदित्य चांदेकर, कोषाध्यक्ष अनिल धोकरीया, डॉ. विलास मढीकर, डॉ. दिलीप धनेश्वर, रूपेश भंडारी, सागर उंडे, किशोर यादव, सोनाली खांडरे आणि नीता बडवे यांच्यासह रक्तपेढीचे संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह रमेश वराडे, सचिन पेंढुरकर, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, शेषराव पालवे, सर्वेश सपकाळ, अभिजीत सपकाळ, सुनीताताई वराडे, प्रांजली सपकाळ यांनी पुरस्कार स्वीकारला.
हरदिन मॉर्निंग ग्रुपने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. विशेषतः रक्तदान क्षेत्रात ग्रुपने केलेले कार्य उल्लेखनीय मानले जात आहे. दरवर्षी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करून व विविध शिबिरात सहभाग नोफ्लदवून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी ग्रुपकडून प्रयत्न केले जातात. कोरोना महामारीच्या कठीण काळात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असताना हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य पुढे सरसावले होते. लॉकडाऊन, भीतीचे वातावरण आणि विविध अडचणी असतानाही सदस्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून अनेक रुग्णांना दिलासा दिला. त्या काळातील सामाजिक संवेदनशीलता आणि सेवाभावामुळे ग्रुपच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
जनकल्याण रक्तकेंद्रानेही हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या या सातत्यपूर्ण सेवाकार्याची दखल घेत “रक्तदान शिबिर संयोजक गौरव पुरस्कार” जाहीर केला. पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवरांनी ग्रुपच्या सामाजिक जाणीवा, सेवाभाव आणि संघटित कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.
संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद पारगावकर म्हणाले की, “हरदिन मॉर्निंग ग्रुपने केवळ रक्तदानापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांतून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता प्रेरणादायी आहे. अशा संस्था व संघटनांमुळे समाजामध्ये सेवाभाव आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
