• Mon. Jan 27th, 2025

आमदार संग्राम जगताप म्हणाले, पक्ष व राजकारणाचा विचार न करता…..

ByMirror

May 28, 2022

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहर स्थापना दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची परिस्थिती, निवडणूक, पक्ष व राजकारणाचा विचार न करता भविष्यातील पन्नास वर्षाचा विचार करुन शहराची विकास कामे केली जात आहे. विकासात्मक बदल होत असताना शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. या शहराचे वेगळेपणे म्हणजे नागरिकांना शहराचा स्थापना दिवस माहित आहे. नगरकरांना इतिहास ज्ञात होण्यासाठी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शनिवारी (28 मे) ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार जगताप बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, माजी उपमहापौर दीपक सुळ, संजय चोपडा, उबेद शेख, सुहास मुळे, शशीकांत नजान, वहाब सय्यद, आर्किटेक फिरोज शेख, सुहास खामकर, राजेंद्र येंडे, इंजी. इम्रान खान, अफजल सय्यद, अकलाख शेख, अन्सार सय्यद, कोतवालीचे पो.नि. संपत शिंदे, जुनेद शेख, नवेद शेख, मयुर जोशी, गणेश बोरुडे आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहराचा व उपनगराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून, पुरातत्व खात्याने बांधकाम परवानगीसाठी असणारी अट शिथिल करण्याची गरज आहे. परवानगी नसली तरी बांधकाम थांबत नसून, बांधकाम होत आहे. यामध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. तसेच बुरुडगाव येथील साईनगर उद्यान व मिस्किन मळा येथील गंगा उद्यानात म्युझिकल फाऊंटन तसेच बुरुडगाव रोड येथे एक एकरमध्ये उभे राहत असलेल्या अद्यावत हॉस्पिटल प्रकल्पाची माहिती दिली. बागरोजा पर्यंतचा रास्ता शासनाच्या माध्यमातून नक्की करू, यामध्ये अडथळे आल्यास शेवटी लोकसहभागातून हा रस्ता नक्की उभारण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


सुहास मुळे म्हणाले की, ज्याने शहर वसविले त्याच्या कबरीवर जाण्यापर्यंत रस्ता नाही. आस्था असणार्‍यांनी या रस्त्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येथील घर व खिडक्यातून वाट काढत बागरोजा येथे यावे लागणार आहे. इतर देशात एतिहासिक वास्तूंना मोठ्या आस्थेने जतन केले जाते. मात्र आपल्याकडे याची कदर केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी अहमदनगर शहराची तुलना कैरो, बगदाद सारख्या मोठ्या शहरांशी होत असे, मात्र ही तुलाना राहता हा विकास साधण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगून, शहराचा इतिहास सांगणारा लेझर शो प्रकल्प राबविण्याची आशा व्यक्त केली. उबेद शेख यांनी शहराच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देवून, बागरोजा येथील ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर असलेल्या बागरोजा येथील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे व या परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव बनवण्याची आयुक्तांकडे मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *