• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करा!

ByMirror

Aug 13, 2026
अहिल्यानगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

अहिल्यानगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाच दिवसीय बँकिंग आठवडा लागू करण्याच्या प्रलंबित मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (UFBU) च्या देशव्यापी आवाहनानुसार अहिल्यानगरमधील बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. प्रोफेसर चौक येथील युनियन बँकेसमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये शहरातील सर्व बँकांमधील बहुसंख्य कर्मचारी आणि अधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
बाराव्या द्विपक्षीय करारात (12th BP Settlement) इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) पाच दिवसीय बँकिंग तत्त्वतः मान्य करूनही, केंद्र सरकारकडून यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पाच दिवसांचा आठवडा आमचा हक्क”, “सरकारचा वेळकाढूपणा चालणार नाही”, “आवाज कुणाचा… बँक कर्मचाऱ्यांचा” अशा जोरदार घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष कॉ. माणिक अडाणे यांनी करून आंदोलनाची मुख्य भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कॉ. कांतीलाल वर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरकारच्या वेळकाढू धोरणावर कडक शब्दांत टीका केली व लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.


या निदर्शनांमध्ये कॉ. संदीप सरोवरे, कॉ. सागर तनपुरे, कॉ. सचिन शिरसाठ, कॉ. प्रकाश कोटा, कॉ. शशांक नवले, कॉ. महेश पंडित, कॉ. समीर डांगवळे, कॉ. सुरज गाडे, कॉ. अमोल पवार, कॉ. कीर्ती जोशी, कॉ. अमोल बर्वे, कॉ. उमाकांत कुलकर्णी, कॉ. राजेंद्र बेरड, कॉ. पल्लवी लोखंडे, आणि कॉ. प्रतीक्षा गवळी यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहरातील अनेक बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जर सरकारने लवकरात लवकर पाच दिवसीय बँकिंगच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही, तर आगामी काळात युएफबीयू च्या नेतृत्वाखाली तीव्र संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला. निदर्शनांचे सूत्रसंचालन कॉ. सुजय नळे यांनी केले व कॉ. उमाकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *