संस्कृती मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच प्रमाणपत्रे व बॅज प्राप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या” हर घर तिरंगा-2026” या मोहिमेसाठी येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ. अमोल बागुल यांची सलग दुसऱ्या वर्षी तिरंगा स्वयंसेवक/ ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली असून मीडिया अपलोड उपक्रमात पोर्टलनुसार भारतातील सुमारे आठ लाख स्वयंसेवकातून उत्कृष्ट कामगिरीमुळे डॉ.बागूल भारतात पाचव्या क्रमांकावर होते. यामुळे मंत्रालयाच्या वतीने त्यांना पाच प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.
9 ते 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेचा बॅज डॉ.बागूल यांना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ए आय.तंत्रज्ञानाचा वापर करत या उपक्रमाचे वेबपेज,हॅशटॅग,इमेजेस, व्हिडिओ, गाणी देखील डॉ.बागुल यांनी तयार केली आहेत. “वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम विशेष महत्त्वाची आहे. देशासाठी आपण आपल्या गुणवत्तेतून देशप्रेम दर्शवत असतो.याही वर्षी नागरिकांनी ध्वजसंहितेचे पालन करून तिरंगा सेल्फी काढून मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करावा व इतरांना देखीलप्रोत्साहित करावे. यातून नव्या पिढीमध्ये देशभक्ती अजून समृद्ध होण्यासाठी मदत होणार आहे”असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी केले.
भारत सरकारच्या माध्यमातून याआधी डॉ.बागुल यांनी जिल्ह्याचे स्वच्छतादूत, मतदारदूत, नि:क्षय मित्र, सायबर ॲम्बेसिडर, युनिसेफ-WHO स्वयंसेवक, एडस् व्हॉटसअपदूत ,विद्यांजली स्वयंसेवक,इस्रो-नासा स्पेस एज्युकेटर,आदी घटकांच्या माध्यमातून स्वतःचे कलाकौशल्य व सोशल मीडियाचा चपखल वापर करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध उपक्रमांमध्ये भरघोस योगदान देऊन जिल्ह्याला अनेक जिल्हा, राज्य, विभाग, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

