• Fri. Apr 24th, 2026

महिला शिक्षिकांचा गौरव करून महिला दिन साजरा

ByMirror

Mar 8, 2026

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महिला शिक्षिका सन्मानित


संस्कारक्षम पिढी घडविण्यात महिला शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका -प्रा. माणिक विधाते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाज घडविण्यात आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यात महिला शिक्षिकांचे मोठे योगदान असल्याने त्यांचा सन्मान होणे आवश्‍यक आहे, या भावनेतून आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. तारकपूर येथील सेंट विवेकानंद स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात शाळेतील महिला शिक्षिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.


या कार्यक्रमास शहर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिक विधाते, नगरसेवक मोहित पंजाबी, जितू गंभीर, पत्रकार विठ्ठल लांडगे, शालेय संस्थेचे अध्यक्ष राम मेघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, विश्‍वस्त राजू गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरीश मध्यान, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गीता तांबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन पापडेजा, विवेक गायकवाड, लोफ्लढे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि समाज घडविण्यातील महिलांचे योगदान यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.


प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष राम मेघानी म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना आणि महिलांना समान संधी दिली पाहिजे. आज महिला शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान राखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


विठ्ठल लांडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजात महिलांचा मान-सन्मान राखला जात असताना मुलांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार होणे आवश्‍यक आहे. हे संस्कार रुजविण्याचे कार्य राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने महिला उत्तम प्रकारे करू शकतात. आज महिला शिक्षिका केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, संस्कार आणि समाजाबद्दलची जबाबदारीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महिला शिक्षिका घरातील जबाबदाऱ्या सांभाळून शाळेत विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांचे हे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून दरवर्षी महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान केला जातो. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अहिल्यानगरची एक कन्या कलेक्टर झाल्याचा अभिमान आहे. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना पटेल व अश्‍विनी देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांचन पापडेजा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *