• Fri. Nov 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण द्या; जय हिंद फाउंडेशनचा ४१ मंत्र्यांना साकडे!

ByMirror

Nov 27, 2026
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना लोकशाहीतही प्रतिनिधित्व मिळावे

ग्रामपंचायतीपासून विधानपरिषदेपर्यंत स्वीकृत सदस्यत्वाची मागणी; हिवाळी अधिवेशनात अध्यादेश काढण्याची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्याचे आवाहन


सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना लोकशाहीतही प्रतिनिधित्व मिळावे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची महत्त्वाची वर्षे समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना आता राजकीय क्षेत्रातही सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्यपाल नियुक्त आमदारांपर्यंत प्रत्येक स्तरावर माजी सैनिकांसाठी प्रत्येकी एक स्वीकृत सदस्यपद राखीव ठेवण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र शासनातील सर्व ४१ मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले असून, त्यांनी या मागणीची मुख्यमंत्री महोदयांकडे शिफारस करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर तसेच महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिक परिवार आणि शहीद परिवार यांच्या वतीने राज्य सरकारच्या 41 मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात अध्यादेश काढावा किंवा शासन निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक पाठिंबा देऊन मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस करावी, अशी भूमिका फाउंडेशनने मांडली आहे.


जय हिंद फाउंडेशनने केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक स्वीकृत सदस्य माजी सैनिकांसाठी नियुक्त करण्यात यावा. त्याचप्रमाणे नगरपरिषदा आणि नगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक, महानगरपालिकांमध्ये एक स्वीकृत सदस्य, पंचायत समित्यांमध्ये एक स्वीकृत पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदांमध्ये एक स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य म्हणून माजी सैनिकांना संधी देण्यात यावी.


याशिवाय राज्यपाल नियुक्त आमदारांमध्येही एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अशा प्रकारे गावपातळीपासून राज्याच्या विधिमंडळापर्यंत माजी सैनिकांना लोकप्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण निश्चित करावे, अशी फाउंडेशनची भूमिका आहे.
माजी सैनिक देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही समाजासाठी विविध प्रकारे योगदान देत असतात. सामाजिक उपक्रम, ग्रामविकास, जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी अनेक माजी सैनिक प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक खर्च आणि इतर अडचणींमुळे अनेकांना राजकीय क्षेत्रात थेट प्रवेश करणे शक्य होत नाही.


माजी सैनिकांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वक्षमता आणि संघटनात्मक कामाचा अनुभव असतो. या गुणांचा उपयोग लोकशाही व्यवस्थेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक लढविण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या माजी सैनिकांना स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळाल्यास ग्रामीण आणि शहरी विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे.
माजी सैनिकांच्या या मागणीला धोरणात्मक स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनात अध्यादेश काढावा किंवा आवश्यक शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे लेखी शिफारस करावी. तसेच माजी सैनिकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न या अधिवेशनात मार्गी लावावा, अशी अपेक्षा जय हिंद फाउंडेशनने व्यक्त केली आहे.


माजी सैनिकांना राजकीय आरक्षण किंवा स्वीकृत सदस्यत्वाची संधी देणे हा त्यांच्या देशसेवेचा सन्मान ठरेल. सैनिकांनी देशाच्या सीमांचे रक्षण करताना दाखविलेली शिस्त, निष्ठा आणि समर्पण हीच मूल्ये समाजकारण आणि लोकप्रशासनातही उपयोगी पडतील. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करून घेण्याची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.


या मागणीला राज्यातील विविध लोकप्रतिनिधींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे जय हिंद फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. राज्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी माजी सैनिकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे शिफारस पाठविली असल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी सैनिक परिवार आणि शहीद परिवारांच्या वतीने ही मागणी करण्यात आली असून, सरकारने या विषयाकडे केवळ एका घटकाची मागणी म्हणून न पाहता देशसेवा केलेल्या सैनिकांच्या सन्मानाचा आणि लोकशाहीतील सहभागाचा प्रश्न म्हणून पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *