• Fri. Nov 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

मार्कंडेय मंदिर देवस्थानचा बदल अर्ज फेटाळला

ByMirror

Nov 27, 2026
मार्कंडेय मंदिर देवस्थानचा बदल अर्ज फेटाळला

गणेश विद्ये यांच्या विश्वस्त मंडळाच्या वैधतेवर धर्मादाय आयुक्तांचा सवाल!


मार्कंडेय मंदिरच्या विश्वस्त मंडळाला कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट; बदल अर्ज धर्मादाय उपआयुक्तांकडून नामंजूर!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान (नोंदणी क्र. ए-23) या सार्वजनिक न्यासाच्या विश्वस्त मंडळाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देताना धर्मादाय उपआयुक्तांनी सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अर्ज नामंजूर केला आहे. धर्मादाय उपआयुक्त न. वा. जगताप यांनी 21 ऑक्टोबर 2026 रोजी हा निकाल दिला. या निर्णयामुळे अध्यक्ष म्हणून प्रस्तावित करण्यात आलेले गणेश गंगाराम विद्ये आणि त्यांच्यासह निवडण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीला आवश्यक कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात बदल करण्यासाठी मंगलारम् ज्ञानेश्वर विठ्ठल यांनी बदल अर्ज क्रमांक 546/2024 दाखल केला होता. या अर्जाद्वारे जुन्या विश्वस्तांची नावे कमी करून नवीन विश्वस्त मंडळाची नोंद न्यासाच्या परिशिष्ट-1 वर घेण्याची मागणी करण्यात आली होती. प्रस्तावित मंडळामध्ये अध्यक्षपदी गणेश गंगाराम विद्ये, उपाध्यक्षपदी मंगलारम् ज्ञानेश्वर विठ्ठल, सचिवपदी सतीश बाळकृष्ण पागा, सहसचिवपदी विनायक काशिनाथ बोगा, खजिनदारपदी प्रणित नारायण अनमल, तर ज्येष्ठ विश्वस्तपदी अंजय्या नारायण यंगल यांच्यासह अन्य विश्वस्तांची नावे समाविष्ट करण्यात आली होती.
मात्र, या बदल अर्जाला शरद लिंगप्पा क्यादर यांनी आवश्यक पक्षकार म्हणून सहभागी होत कायदेशीर आक्षेप घेतला. प्रस्तावित विश्वस्त मंडळाची निवड संस्थेच्या घटनेनुसार झालेली नाही, तसेच जुन्या विश्वस्तांच्या नोंदींबाबतही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर धर्मादाय उपआयुक्तांनी बदल अर्ज नामंजूर करण्याचा निर्णय घेतला.


धर्मादाय उपआयुक्तांनी निकालात नोंदविलेल्या महत्त्वाच्या निरीक्षणांनुसार, सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी नवीन विश्वस्त मंडळाची निवड संस्थेच्या घटनेतील तरतुदींनुसार झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अर्जदाराकडून सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रस्तावित विश्वस्त मंडळाच्या निवडीची कायदेशीर वैधता सिद्ध होऊ शकली नाही.
याशिवाय श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानचे विश्वस्त ज्या मूळ संस्थेच्या म्हणजेच पंचकमेटी पद्मशाली ज्ञाती समाज न्यास (नोंदणी क्र. ए-41) यांच्या विश्वस्त मंडळातून निवडले जातात, त्या मूळ संस्थेचा बदल अर्जही नामंजूर झालेला असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्या संस्थेच्या आधारे प्रस्तावित करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला कायदेशीर आधार मिळत नसल्याचे निरीक्षण धर्मादाय उपआयुक्तांनी नोंदविले.


बदल अर्जामध्ये जुन्या विश्वस्तांची नावे परिशिष्ट-1 वरून कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित जुन्या विश्वस्तांची नावे यापूर्वी परिशिष्ट-1 वर मंजूर झाल्याचा कोणताही आदेश अथवा अधिकृत पुरावा अर्जदाराकडून सादर करण्यात आला नाही. त्यामुळे जुन्या नोंदी रद्द करण्याच्या मागणीबाबतही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः अर्जदार मंगलारम् ज्ञानेश्वर विठ्ठल यांनी निशाणी क्रमांक 12 वर सदर बदल अर्ज पुढे चालवायचा नसल्याबाबत पुरसीस दाखल केली होती. अर्जदारानेच माघार घेण्याची भूमिका मांडल्याची बाबही सुनावणीदरम्यान विचारात घेण्यात आली. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून अर्जामध्ये नमूद करण्यात आलेला बदल कायदेशीररीत्या घडल्याचे दिसून येत नसल्याचे निरीक्षण धर्मादाय उपआयुक्तांनी नोंदविले. त्यानुसार बदल अर्ज क्रमांक 546/2024 नामंजूर करण्याचा आदेश खुल्या न्यायालयात घोषित करण्यात आला.
या सुनावणीदरम्यान अर्जदार मंगलारम् ज्ञानेश्वर विठ्ठल यांच्यातर्फे ॲड. एस. बी. गायकवाड यांनी, तर सामनेवाला शरद लिंगप्पा क्यादर यांच्यातर्फे ॲड. पी. व्ही. बल्लाळ यांनी काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *