• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

महारवतनाच्या शेतजमिनीवर बेकायदा कब्जाचा विधवा महिलेचा आरोप

ByMirror

Mar 12, 2026
कारवाई न झाल्यास 16 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

धमक्या देऊन ताबामारी करणाऱ्या गुंडांवर कारवार्इची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


कारवाई न झाल्यास 16 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महारवतनाच्या ढोरजे (ता. श्रीगोंदा) येथील शेतजमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करून धमक्या देणे व शेतात येण्यास मज्जाव केल्याचा आरोप करत वत्सला भोईटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा 16 मार्च 2026 पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, त्या ढोरजे (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी असून अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. मौजे ढोरजे येथील गट क्रमांक 246 मध्ये त्यांच्या वडीलोपार्जित महारवतनाची शेतजमीन आहे. या जमिनीबाबत खरेदीखत रद्द करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. सदर जमिनीची मालकी पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाकडे असून पतीच्या निधनानंतर त्या स्वतः ही जमीन कसत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


मात्र, या जमिनीवर इतर वारसांचा हक्क असताना कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील एका धनदांडग्या व्यक्तीने ती जमीन बेकायदेशीरपणे पैशाच्या जोरावर खरेदी केल्याचा दावा करत शेतात येण्यास मज्जाव केल्याचा आरोप भोईटे यांनी केला आहे. संबंधित व्यक्ती गावगुंड व राजकीय पाठबळाच्या जोरावर न्यायालयीन वाद प्रलंबित असतानाही मनमानी पद्धतीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी 2026 रोजी देखील अशाच प्रकारे त्रास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात तक्रार देण्यासाठी त्या बेलवंडी पोलीस ठाण्यात गेल्या असता सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तक्रार घेण्यास नकार दिला व अपमानित करून परत पाठविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, आपली तक्रार जागेवर ताबा मारणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भोईटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *