• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

विवाह जुळविताना अवाजवी अपेक्षा टाळून, सामंजस्याची भूमिका स्वीकारावी -भगवान फुलसौंदर

ByMirror

Mar 25, 2026
अनेकांचे संसार फुलविण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

अहिल्यानगरात राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळावा उत्साहात


अनेकांचे संसार फुलविण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बदलत्या सामाजिक रचनेमुळे विवाह जुळविणे ही सर्व समाजासाठी मोठी गरज बनली असून, विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी-व्यवसाय आणि सोशल नेटवर्किंगमुळे परस्पर भेटीगाठी कमी झाल्याने मुला-मुलींचे विवाह जुळविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पालकांनी अवाजवी अपेक्षा न ठेवता सामंजस्याची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.


रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, जनवार्ता, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले महिला संस्था, श्री संत सावता माळी युवक संघ तसेच जागृती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.


या वेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहर बँकेचे व्हाइस चेअरमन प्रा. माणिक विधाते, किशोर डागवाले, नगरसेविका आशाताई डागवाले, साहेबराव निधाने, दत्ता जाधव, मंगलताई भुजबळ, सारंग पंधाडे, मच्छिंद्र बनकर, प्रा. सिताराम जाधव, ॲड. महेश शिंदे, प्रा. अश्‍विनी जाधव, ॲड. पोपटराव बनकर, जयश्रीताई शिंदे, स्वाती बनकर, ॲड. दिनेश शिंदे, नितीन डागवाले, दर्शन बनकर, अनंत द्रविड, प्रा. संजय पडोळे, तुषार रणनवरे, रामेश्‍वर राऊत आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी पुढे बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले की, बदलत्या काळानुसार केवळ सरकारी नोकरी करणारा वधू-वर मिळावा या अपेक्षेवर ठाम राहणे योग्य नाही. अनेक तरुण-तरुणी उद्योग-व्यवसायात पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभाव, निर्व्यसनी जीवनशैली आणि कुटुंब पार्श्‍वभूमीचा विचार करून विवाह जुळविणे आवश्‍यक आहे. लग्न करताना अहंकार बाजूला ठेवून तडजोडीची भूमिका घेणे काळाची गरज बनली आहे. शिक्षण आणि करिअरमुळे विवाहाचे वय वाढत असून, योग्य वेळी विवाह होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले की, समाजाची गरज ओळखून मागील काही वर्षांपासून हा वधू-वर मेळावा आयोजित केला जात आहे. मागील वर्षात 45 विवाह जुळविण्यात यश आले असून, यामध्ये अनेकांचे लग्न होऊन संसार स्थिरावले आहेत. या उपक्रमातून समाजातील अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केले.


किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे आणि प्रा. माणिक विधाते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. दत्ता जाधव यांनी सांगितले की, संस्था केवळ विवाह जुळवून थांबत नाही, तर नवदांपत्यांचे संसार अधिक सक्षम कसे होतील यासाठीही मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठीही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे स्पष्ट केले.
विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणी आणि सध्याची सामाजिक परिस्थिती यावर प्रा. संजय पडोळे व मंगलताई भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. प्रा. पडोळे म्हणाले की, मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्याने स्थळ शोधणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी, बंगला, चारचाकी, शेती यांसारख्या अपेक्षा रास्त असल्या तरी त्यावर अडून राहणे चुकीचे आहे. छोटे उद्योग-व्यवसाय आणि चांगले कुटुंब यांनाही प्राधान्य दिले पाहिजे.


मंगलताई भुजबळ म्हणाल्या की, शिक्षणानंतर विवाह जुळविणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया बनली आहे. वाढत्या अपेक्षांमुळे अनेकांचे विवाह उशिरा होत आहेत. शेतकरी व व्यावसायिक कुटुंबातील मुलांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून योग्य जोडीदार निवडताना समंजसपणा आवश्‍यक असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले. आभार ॲड. पोपटराव बनकर यांनी मानले.


समाजभूषण पुरस्काराचे वितरण
विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये साहेबराव खंडूजी निधाने, संजय शिवाजी मेहेत्रे, पुजा बिभीषण देवळकर (धोंडे) आणि
अशोकराव कुंडलीक भालके यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *