नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून आयोजन; निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी
15 व 17 वर्षांखालील मुलांसह 17 वर्षांखालील मुलींना संधी; देशातील 20 हून अधिक शहरांत निवड चाचणीत अहिल्यानगरचाही समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देत युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘इंडिया खेलो फुटबॉल’ अंतर्गत अहिल्यानगरमध्ये रविवार दि. 4 ऑक्टोबर रोजी विशेष निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून ही निवड चाचणी घेण्यात येणार असून, 15 व 17 वर्षांखालील मुलांसह 17 वर्षांखालील मुलींना यात सहभागी होता येणार आहे.
या निवड चाचणीतून गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या खेळाडूंना पुढील टप्प्यातील ‘इंडिया खेलो फुटबॉल’ प्री-फायनल स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच पुढे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय फायनल स्पर्धेत खेळण्याची संधीही निवड झालेल्या खेळाडूंना मिळणार असल्याची माहिती नमोह फुटबॉल क्लबच्या संघमालक नमिता फिरोदिया यांनी दिली.
अहिल्यानगरमध्ये फुटबॉलच्या प्रसारासाठी तसेच स्थानिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. क्लब हा ‘इंडिया खेलो फुटबॉल’ उपक्रमाचा विभागीय पार्टनर असून, या माध्यमातून नगरमधील युवा फुटबॉलपटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी देशभरातील 20 हून अधिक शहरांमध्ये निवड चाचण्या घेण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नगर व परिसरातील युवा फुटबॉल खेळाडूंसाठी ही निवड चाचणी महत्त्वाची संधी ठरणार आहे. अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या निवड चाचणीत 17 वर्षांखालील मुले, 15 वर्षांखालील मुले तसेच 17 वर्षांखालील मुली सहभागी होऊ शकणार आहेत. सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आपल्या खेळातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, निवड प्रक्रियेतून पुढील स्तरासाठी पात्र खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
ही निवड चाचणी रविवारी अशोक भाऊसाहेब फिरोदिया स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आली आहे. अहिल्यानगर व परिसरातील इच्छुक युवा फुटबॉलपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. निवड चाचणी व सहभागासंदर्भातील अधिक माहितीसाठी 8149130120 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

