पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार
धनत्रयोदशीला वनसंरक्षणाचा संकल्प, अहिल्यानगरातून ‘हरित श्रीमंती’ची देशव्यापी हाक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यंदाची धनत्रयोदशी ‘वनत्रयोदशी’ म्हणून साजरी करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने केले आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी अहिल्यानगरच्या हुतात्मा स्मारकात दोन्ही संघटनांच्या वतीने वनत्रयोदशी साजरी होणार असून, तेथून ‘हरित श्रीमंती’चा देशव्यापी संकल्प जाहीर केला जाणार आहे.
सह्याद्रीची दाट जंगले, त्यांतून उगम पावणारे झरे, सुपीक माती आणि वन्यजीवांची विविधता ही देशाची ‘हरित श्रीमंती’ आहे. पाणी, अन्न आणि निवारा देणारी ही नैसर्गिक संपदा जपणे ही माणसासह जीवसृष्टीच्या अस्तित्वाची अट आहे, अशी भूमिका संघटनांनी मांडली. सह्याद्रीतील नैसर्गिक जंगलांची तोड थांबवून पाणलोट क्षेत्रे, झरे आणि वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 27 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी 15 डिसेंबर 2026 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी नामंजूर झालेल्या दाव्यांचीही फेरतपासणी केली जाणार आहे. संबंधित दावेदारांना नामंजुरीची कारणे समजावून सांगून अतिरिक्त पुरावे आणि आपले म्हणणे सादर करण्याची संधी देण्याचे निर्देश आहेत. अशा दावेदारांनी जुना आदेश व उपलब्ध पुरावे घेऊन संबंधित वनहक्क समितीकडे फेरतपासणीसाठी लेखी पाठपुरावा करावा, असे आवाहन संघटनांनी केले.
वनहक्क अधिनियम, 2006 अंतर्गत पात्र अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांच्या ताब्यातील, निवासासाठी किंवा उपजीविकेच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनजमिनीवरील हक्कांना कायद्यानुसार मान्यता द्यावी. प्रलंबित दाव्यांवर वेळेत निर्णय घेऊन दावे मंजूर झालेल्या कुटुंबांना वनहक्कपत्रे आणि संबंधित महसुली अभिलेख द्यावेत, अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली.
मानवी कृतींमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात नैसर्गिकरीत्या उद्भवणारा ‘एल निनो’ भारताच्या मान्सूनच्या पावसावर परिणाम करू शकतो. वाढती उष्णता आणि पावसातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी जंगले व जलस्रोतांचे रक्षण तातडीचे आहे, असे संघटनांनी म्हंटले आहे.
ग्रामसभा, वननिवासी, शेतकरी आणि नागरिकांनी या दिवाळीत आपापल्या गावात वनत्रयोदशी साजरी करावी, स्थानिक जंगले व जलस्रोत जपण्याचा संकल्प करावा आणि पात्र वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी एकत्र पाठपुरावा करावा, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने केले आहे. या अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, ज्ञानेश्वर चांदणे, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

