वैष्णवी मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष न्यायालयीन कोठडीत
शेतजमीन विकायला लावून ठेवी स्वीकारल्या; ठेवींच्या अपहारप्रकरणी संस्थापक अध्यक्षाला अटक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतजमीन विक्रीतून मिळालेली रक्कम वैष्णवी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवीच्या स्वरूपात जमा करण्यास भाग पाडून त्या रकमेचा संचालक मंडळाने संगनमताने अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय राधाकिसन गव्हाणे यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांमधील ठेवींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वडगाव गुप्ता येथे वैष्णवी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय राधाकिसन गव्हाणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फिर्यादी आप्पासाहेब शंभू शेवाळे, त्यांचे भाऊ अशोक शंभू शेवाळे आणि पुतणे बापू अशोक शेवाळे यांना त्यांच्या मालकीची शेतजमीन विक्री करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेला मोबदला वैष्णवी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवीच्या स्वरूपात जमा करण्यात आला होता. मात्र, या ठेवींच्या रकमेचा संस्थेचे संचालक मंडळ आणि संबंधितांनी संगनमताने अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर संबंधित संस्था वडगाव गुप्ता येथून जुन्नर येथे स्थलांतरित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय राधाकिसन गव्हाणे यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

