ज्येष्ठांचा गुणदर्शन कार्यक्रम, महा उपलब्धी योजनेबाबत मार्गदर्शन आणि मित्रपरिवाराच्या गाठीभेटींनी रंगला स्नेहसोहळा
गवळण, भजने, कविता आणि गाण्यांनी ज्येष्ठांनी जिंकली मने; मान्यवरांचा सन्मान आणि दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. सेवानिवृत्तीनंतरही जपलेली मैत्री, जुन्या आठवणी, परस्परांबद्दलचा जिव्हाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद यामुळे हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला. या वेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या महा उपलब्धी योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सत्कार, दिवंगतांना श्रद्धांजली आणि ज्येष्ठांच्या कलागुणांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आली.
हॉटेल संजोग येथे हा स्नेह मेळावा रंगला होता. रमेश देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर पी. एन. डफळ यांनी स्वागतगीत सादर केले. दुर्गादास पुंड यांनी प्रास्ताविक केले आणि अध्यक्षीय निवडीची सूचना मांडली. त्यानंतर सयाजीराव वाव्हळ यांच्याकडे पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपविण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शरद कुलकर्णी यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून आसाराम सोनसळे आणि लक्ष्मण रासकर महाराज यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार किरण मुळे, सोपानराव साबळे आणि सर्जेराव ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर अशोक मुळे, वासुदेव राक्षे, दिलीप चावक आणि प्रभाकर ठिपसे यांच्या उपस्थितीत देवी श्रीसरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
या वर्षात निधन झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. रामचंद्र कुलकर्णी यांनी दिवंगत व्यक्तींची नावे वाचून दाखवली. त्यानंतर उपस्थितांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. शासनाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महा उपलब्धी योजनेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी डॉ. मुकुंद शिंदे आणि गणेश नरोटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून योजनेतील विविध बाबी समजावून सांगत उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या वेळी सहकार्य करण्याची ग्वाहीही अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे उपस्थितांना योजनेची माहिती समजून घेण्याची संधी मिळाली. या वेळी डॉ. मुकुंद शिंदे यांचा रोहिदास बोरुडे आणि अरविंद काळे यांच्या हस्ते, तर गणेश नरोटे यांचा प्रल्हाद जोशी आणि रघुनाथ वाबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नेत्रदूत जालींदर बोरुडे यांचाही रमेश बेरड आणि रतन तुपविहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी नेहमीच स्वेच्छेने योगदान देणाऱ्या किसन लांडे, बाबासाहेब कराळे, मारुती औरंगे, गोरख कुंभार, दत्तात्रय पानसरे आणि सुरेश आरवडे यांचा दुर्गादास पुंड यांच्या हस्ते प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यानंतर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष विलास पेद्राम आणि माजी खजिनदार सुभाष मुनोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अरविंद काळे यांनी संयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात माध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेताना जुन्या मित्रांच्या गाठीभेटी झाल्या. अनेक वर्षे एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सेवाकाळातील अनुभव, सहकाऱ्यांसोबत घालवलेले क्षण आणि परस्परांशी जपलेले संबंध यांची या वेळी आवर्जून चर्चा झाली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात देवराम गुंड, प्रल्हाद जोशी, एकनाथ विधाते, गोकुळ देवतरसे, सुभाष तळेकर, झुंबर झांजे, पांडुरंग डफळ, सयाजीराव वाव्हळ आणि अशोक मोळके आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या ज्येष्ठांनी गवळण, भजने, कविता, गाणी आणि विनोदी कथन सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. वयाची मर्यादा बाजूला ठेवत ज्येष्ठांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमात हास्य-विनोद आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची भाषणे आणि अध्यक्षीय मनोगत झाले. अल्पोपहार व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सुधीर चिकटे यांनी साहित्यिक शैलीत आभार मानले, तर सयाजीराव वाव्हळ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या स्नेहमेळाव्यास जनार्दन सिंदीकर, रघुनाथ वाबळे, रमेश कराळे, सुनील सोयगांवकर, बबनराव भोकरे (पुणे), यशवंत धोत्रे, विश्वनाथ शिंदे, मुरलीधर ठोंबरे, अशोक फुले, दत्तात्रय जगताप, संपत साठे, अमीन इनामदार, नंदकिशोर माडीवाले, शंकर जाधव, यासीन शेख यांच्यासह वाघ, आव्हाड, रासकर, कुलकर्णी, बाचकर, घोडके, निमसे, माळवदे आणि जालींदर बोरुडे आदी अनेक ज्येष्ठ परिवारातील सदस्य उपस्थित होते. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक मोळके, सोपानराव साबळे, बाबासाहेब लांडगे, प्रकाश लोखंडे, बापू निंबाळकर, ताराचंद राजळे, दुर्गादास पुंड, रमेश देशमुख, रोहिदास बोरुडे आणि सयाजीराव वाव्हळ यांनी विशेष परिश्रम घेतले. दुर्गादास पुंड यांनी गतवर्षीच्या जमा-खर्चाचा हिशोब पारदर्शकतेच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी दर्शनी भागात फलकावर लावला होता. सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांशी जपलेले स्नेहसंबंध, मैत्री आणि आपुलकी या स्नेहमेळाव्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद ओसंडून वाहत होता.

