शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना ट्रस्ट संचलित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) आणि जकरीया आघाडी प्राथमिक शाळेच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती संध्या गायकवाड यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा. जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफिक मुंशी यांच्या हस्ते श्रीमती गायकवाड यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राचार्या मेघना राजेंद्र कुलकर्णी आणि मुख्याध्यापिका शमीम पठाण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका इशा तांबोळी यांनी केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी अहमदनगर यतीमखाना ट्रस्ट संचलित शाळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील आपुलकी, शिस्त, आत्मविश्वास आणि एकमेकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. वसतिगृहातील वातावरणात विद्यार्थी अत्यंत आनंदाने, मोकळेपणाने आणि एकोप्याने राहत असल्याचे पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कुराण पठणाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “प्रत्येक मूल हे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील हे गुण ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवावा.”
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेले परिश्रम आणि अहमदनगर यतीमखाना ट्रस्टचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील कौशल्याधारित शिक्षण, अनुभवाधारित अध्ययन, सर्जनशीलता आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
भविष्यात विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

