• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अहिल्यानगरात तिसरी धम्म परिषद

ByMirror

May 18, 2026
बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम; बौद्ध बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

धम्मदीक्षा सोहळा, भिक्खू संघांचे मार्गदर्शन आणि ‘माता रमाई गौरव पुरस्कार’ वितरणाने होणार सामाजिक जागर


बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम; बौद्ध बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- त्याग, समर्पण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटी (भारत) यांच्या वतीने शहरात तिसऱ्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 27 मे रोजी न्यू टिळक रोड, सक्कर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा दिवसभर विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या धम्म परिषदेला सर्व समाजबांधव, माता-भगिनी आणि बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अहिल्यानगर महापालिकेचे माजी आयुक्त डाॅ. पंकज जावळे व तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.


धम्म परिषदेच्या निमित्ताने समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी योगदान देणाऱ्या सहा महिलांना “त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मालतीताई मारुती साठे, डाॅ.प्रा. रत्ना संजय वाघमारे, डाॅ. सिताताई विठ्ठलराव भिंगारदिवे, सुनिताताई माधवराव गायकवाड, ॲड. सुरेखा प्रदीपकुमार चौदंते व गौतमीताई सुरेश भिंगारदिवे यांचा समावेश आहे. या महिलांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.


कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी सकाळी 8 वाजता पूज्य भन्ते भिक्खू संघ यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण आणि सुत्तपठणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता भिक्खू संघास भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 4 वाजता अविनाश कांबळे प्रस्तुत बुद्ध-भीम गीतांचा “कादंबरी आर्केस्ट्रा” हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून यामधून बौद्ध आणि आंबेडकरी विचारांचा जागर करण्यात येणार आहे.


संध्याकाळी 6 वाजता आयोजित विशेष धम्म मार्गदर्शन सत्रात विविध भागांतून आलेले भन्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पूज्य भन्ते यश थेरो (श्रीलंका), भन्ते परमानंद (बुद्धगया),भन्ते सचित्तबोधी (पुणे), भन्ते आनंद (पुणे), भन्ते भारद्वाज (येवला) आणि भन्ते धम्मपाल (अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. बुद्ध धम्म, मानवता, समता आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर ते विचार मांडणार आहेत.


रात्री 8 वाजता बौद्ध धम्माचे अभ्यासक सत्येंद्र तेलतुंबडे यांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळा पार पडणार आहे. या वेळी अनेक उपासक बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारणार असून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कारांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


त्याग, समर्पण आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित धम्म परिषद आणि धम्मदीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या धम्म परिषदेसाठी नीलक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, रेल्वे स्टेशन आंबेडकरी समाज, समस्त स्वाभिमानी आंबेडकर समाज तसेच सर्व बौद्ध बांधव-भगिनी परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *