दोन दशकांपासून निस्वार्थ सामाजिक कार्य; कोरोना काळातील योगदानाची विशेष दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात माणुसकी, ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देत गेली दोन दशके निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रमांच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे यांच्या हस्ते अल्ताफ सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी साहित्यिक प्रतिभा खैरनार, युवा किर्तनकार ह.भ.प. दिपाली गणगे-कोकाटे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत चाबुकस्वार, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, उद्योजक दिलावर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद हे गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याची मोठी दखल घेण्यात आली होती. संकटाच्या कठीण काळात अनेक कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत पोहोचवून त्यांनी हजारो नागरिकांना आधार दिला.
शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेपासून त्यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठीही मोठे योगदान दिले. बूथ हॉस्पिटलला आवश्यक साहित्य पुरविणे, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंक, मास्क, सॅनिटायझर आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी संकटकाळात समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली.
समाजात वाढत चाललेल्या जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर अल्ताफ सय्यद यांनी ‘मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजात ऐक्य, बंधुता आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वसामान्यांना मदत आणि आधार देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जात आहे.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक मदत, शालेय साहित्य वाटप, मार्गदर्शन शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सय्यद सातत्याने कार्यरत आहेत. गरीब व होतकरू कुटुंबांना विविध प्रकारे मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक गरजू नागरिकांना नवे बळ मिळाले असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य ते करत आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना ‘संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अल्ताफ सय्यद यांच्या कार्याला सलाम केला. अल्ताफ सय्यद यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंद होत आहे.
