वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रभक्तीचा विद्यार्थ्यांमध्ये जागर
मानवी हक्क अभियानातर्फे जयंती सोहळा साजरा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 232 व्या जयंतीनिमित्त मानवी हक्क अभियानाच्या वतीने शहरातील रामवाडी परिसरात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या महान कार्याचा जागर करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान, क्रांतिकारकांना दिलेले प्रशिक्षण तसेच सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्नेहालयातील मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियानाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत डोलारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक डॉ. राजेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी लहान मुलांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या पराक्रमाचा, देशप्रेमाचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा परिचय मुलांनी आपल्या भाषणातून करून दिला.
स्नेहालयाच्या शिक्षिका जयश्री रासणे यांनी स्नेहालयातील प्रकल्पांची माहिती दिली. त्याचबरोबर वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला अभिवादन केले. मानवी हक्क अभियानाचे जिल्हा संघटक अशोक भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आजच्या युवकांनी क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक असून, त्यांचे जीवनकार्य नव्या पिढीला देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संघर्षाची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत डोलारे यांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रप्रेम आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या संघर्षात लहुजी वस्ताद साळवे यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला त्यांनी भक्कम साथ दिली. ‘जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी’ या प्रतिज्ञेतून त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा, राष्ट्रभक्ती आणि समर्पणाची भावना स्पष्टपणे दिसून येते. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे डोलारे यांनी नमूद केले.
या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून स्नेहालयातील उपस्थित मुलांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनीता औटी, पोपटराव भोसले, डॉ. सुनील सकट, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष लखन साळवे, पवार तसेच जिल्हा सल्लागार गोविंद सातपुते यांच्या हस्ते मुलांना खाऊ देण्यात आला.
उपमहापौर धनंजय जाधव, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आणि नगरसेवक सागर मुर्तुडकर यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सचिव शहादेव चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

