भूमिपूजनाला 15 महिने उलटले, तरी पुतळ्यांचे काम रखडलेच! कृती समिती व माळी समाजाच्या आमरण उपोषणाने महापालिका प्रशासनाला जाग
दीड महिन्याचा अल्टिमेटम! अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माळीवाडा वेस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यासाठी भूमिपूजन होऊन तब्बल एक वर्ष तीन महिने उलटले, तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. महापालिका प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात अखेर फुलेप्रेमी आणि माळी समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुतळे उभारणीच्या कामाला तातडीने सुरुवात करावी आणि माळीवाडा वेस परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. 16 नोव्हेंबर) क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समिती आणि अहिल्यानगर सकल माळी समाज संस्थेच्या वतीने माळीवाडा वेशीवरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान, महापालिकेचे उपायुक्त हरीनारायण येलगट्टे आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र, दीड महिन्याच्या आत स्मारक उभारणीबाबत ठोस कार्यवाही सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
उपायुक्त हरीनारायण येलगट्टे आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. फुले दाम्पत्यांच्या स्मारक उभारणीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच स्मारकाच्या जागेतील अतिक्रमणांचे स्थलांतर करून ते निष्कासित करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही कृती समिती आणि सकल माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सकल माळी समाज संस्थेचे अध्यक्ष किशोर डागवाले, कृती समितीचे सचिव अशोक कानडे, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, बजरंग भुतारे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, अमोल गाडे, नगरसेवक दत्ता गाडळकर, सुरेश बनसोडे, गोरख पडोळे, नगरसेविका आशाताई डागवाले, नगरसेविका सुनिताताई फुलसौंदर, सुजाता पडोळे, सकल माळी समाजाचे सचिव अमोल भांबरकर, अनिल इवळे, दिपक खेडकर, मळू गाडळकर, राहुल रासकर, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र ताठे, विष्णुपंत म्हस्के, प्रकाश इवळे, संतोष हजारे, मच्छिंद्र बनकर, मनोज भुजबळ, रोहित पठारे, रमेश चिपाडे, विनायक कोके, सुरेश खरपुडे, रेणुका पुंड, संजय कानडे, अनिल निकम, रोहिणी बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, संपूर्ण समाजाने मोठ्या संयमाने हे आंदोलन स्थगित केले आहे. महापालिका प्रशासनाने पुतळे उभारणीचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. श्री विशाल गणपती मंदिरासमोर यापूर्वी दिलेल्या शब्दाची प्रशासनाने पूर्तता करावी. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, समाजबांधवांच्या भावना तीव्र असून आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर आंदोलन अधिक आक्रमक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व सामाजिक संघटना आणि समाजबांधवांचे त्यांनी आभार मानले.
माळीवाडा वेशीवर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन 27 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते, तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. या सोहळ्यामुळे शहरातील फुलेप्रेमी आणि माळी समाजामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भूमिपूजनानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तब्बल 15 महिन्यांचा कालावधी उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही.
या कामासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून या विषयाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप कृती समिती आणि सकल माळी समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. केवळ निवेदने देऊन आणि पाठपुरावा करून प्रश्न सुटत नसल्याने अखेर बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
माळीवाडा वेस येथे फुले दाम्पत्यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेतील तसेच परिसरातील अतिक्रमणांमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे माळीवाडा वेस आणि परिसरातील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे तातडीने हटवावीत, स्मारकाच्या जागेवरील अडथळे दूर करावेत आणि पुतळे उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला विलंब न करता सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी या महान दाम्पत्याने केलेले कार्य देशाच्या सामाजिक इतिहासात अजरामर आहे. अशा महान समाजसुधारकांचे भव्य स्मारक अहिल्यानगर शहरात उभारण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, भूमिपूजन होऊनही स्मारकाचे काम रखडल्याने फुलेप्रेमी आणि समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
फुले दाम्पत्यांचे स्मारक उभारणे ही केवळ एका समाजाची मागणी नसून शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमणे हटवावीत आणि स्मारक उभारणीच्या कामाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. माळीवाडा वेशीवर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि समाजसेवी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये ओबीसी व्हिजेएनटी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, वीरशैव लिंगायत गवळी समाज, जय भगवान महासंघ, हमाल पंचायत संघटना, चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य, माळी महासंघ अहिल्यानगर, महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघ अहिल्यानगर जिल्हा, जय भगवान महासंघ, सारस ज्येष्ठ नागरिक संघ, सकल ओबीसी भटके विमुक्त यलगार मेळावा, नामदेव विठ्ठल मंदिर शिंपी समाज, जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगर, फुले ब्रिगेड, हर दिन मॉर्निंग ग्रुप भिंगार, आराध्य प्रतिष्ठाण, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य व नेप्ती, सकल अोबीसी भटके विमुक्त एल्गार मेळावा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भिंगार (17 मंडळे), श्री देवांग कोष्टी समाज भिंगार, माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, श्री नामदेव विठ्ठल मंदिर डावरे गल्ली, क्रांतीसुर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान आदी संघटनांचा समावेश आहे. या सर्व संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारी पत्रे कृती समितीकडे सुपूर्द केली.

