• Fri. Oct 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

लायन्स क्लबच्या सेवाभावी उपक्रमांनी गांधी जयंती साजरी; सेवा सप्ताहास प्रारंभ

ByMirror

Oct 2, 2026
महात्मा फुले छात्रालयातील विद्यार्थ्यांना फॅनची भेट

महात्मा फुले छात्रालयातील विद्यार्थ्यांना फॅनची भेट


दुष्काळग्रस्त गावांसाठी विविध उपक्रम राबविणार -हरजितसिंह वधवा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून सेवा सप्ताहास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सेवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माळीवाडा येथील महात्मा फुले छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी फॅनची भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी सकाळी चहा व नाश्‍त्याचीही व्यवस्था करण्यात आली.


लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजातील गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गांधी जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले छात्रालयास सुमित लोढा यांच्या वतीने फॅन देण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, सचिव हरिष हरवाणी, खजिनदार विजय कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख किरण भंडारी, धनंजय भंडारे, सुमित लोढा, सुनील छाजेड, प्रशांत मुनोत, डॉ. सिमरन वधवा, पूर्णाक्षी शाह, सुरेश खामकर, तसेच महात्मा फुले वसतिगृहाचे गणेश कोरडे यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अध्यक्ष हरजितसिंह वधवा यांनी सांगितले की, लायन्स इंटरनॅशनलच्या प्रणालीप्रमाणे 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जगभरात सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गांधीजींनी समाजसेवा, स्वच्छता आणि सर्वसमावेशकतेचा दिलेला संदेश लक्षात घेऊन सेवाभावी उपक्रमांना चालना देण्याचा लायन्स क्लबचा प्रयत्न आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त गावांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


सचिव हरिष हरवानी यांनी सांगितले की, सेवा सप्ताहाच्या माध्यमातून यंदा आरोग्यविषयक उपक्रमांवर विशेष भर देण्याचा क्लबचा मानस आहे. त्यांच्यासाठीही विविध प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. समाजाच्या गरजेनुसार सेवाकार्याचे स्वरूप ठरवून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *