माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी व मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबद्दल गौरव
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे अभ्यासू नेतृत्व -आमदार अक्षय कर्डिले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड तसेच भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याबद्दल शिक्षक नेते बाबासाहेब बोडखे यांचा आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथ वामन, मयुर कराळे, ठाकूरदास परदेशी, सुभाष कराळे आदी उपस्थित होते.
आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की, बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे, अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे तसेच प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्नांची उकल करणारे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी जिल्ह्यासह राज्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
बोडखे हे अभ्यासू आणि उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी त्यांची झालेली निवड ही संस्थेला अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी ठरेल, असा विश्वास आमदार कर्डिले यांनी व्यक्त केला. तसेच पंडित नेहरू हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी त्यांची झालेली पदोन्नती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना देईल, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षक संघटनेतील कार्यासोबतच बाबासाहेब बोडखे यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. विशेषतः दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित न राहता त्या वृक्षांचे संगोपन करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत असतानाच सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणारा शिक्षक म्हणून बाबासाहेब बोडखे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे आमदार कर्डिले यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब बोडखे यांनी आमदार अक्षय कर्डिले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करताना सहकाऱ्यांचे मिळालेले सहकार्य, मार्गदर्शन आणि विश्वास यामुळेच संघटनात्मक कार्याला बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

