रामवाडीतील नागरिकांकडून बीएलओ महेश क्षीरसागर व आसाराम गुंड यांचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामवाडी परिसरात तब्बल ८० टक्के पडताळणीचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि विविध अडचणींवर मात करत हे काम यशस्वी करणारे बीएलओ महेश क्षीरसागर आणि आसाराम गुंड यांच्या कार्याचा रामवाडीतील नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
रामवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा वेचक, असंघटित क्षेत्रातील कामगार, रोजंदारी मजूर, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील बहुतांश नागरिक सकाळी लवकर कामासाठी घराबाहेर पडतात आणि रात्री उशिरा घरी परततात. त्यामुळे विशेष मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पडताळणी करणे हे मोठे आव्हान ठरत होते.
याशिवाय एसआयआर मोहिमेबाबत विविध अफवा आणि गैरसमज पसरल्याने अनेक नागरिक संभ्रमात होते. काही नागरिकांना पडताळणी प्रक्रियेबाबत चुकीची माहिती मिळाल्यामुळे ते सहकार्य करण्यासही साशंक होते. अशा परिस्थितीत बीएलओ महेश क्षीरसागर आणि आसाराम गुंड यांनी संयम, समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेने प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योग्य माहिती दिली तसेच मतदानाचा हक्क आणि मतदार यादीतील नावाचे महत्त्व समजावून सांगत नागरिकांचा विश्वास संपादन केला.
केवळ कार्यालयीन वेळेपुरते मर्यादित न राहता नागरिक ज्या वेळेत घरी उपलब्ध असतील त्या वेळेनुसार दोन्ही बीएलओंनी पहाटे तसेच रात्री उशिरापर्यंत घरोघरी भेटी दिल्या. निरक्षर नागरिकांचे अर्ज भरून देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे, प्रक्रियेची माहिती समजावून सांगणे आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे रामवाडी परिसरातील सुमारे ८० टक्के एसआयआर पडताळणीचे काम पूर्ण होऊ शकले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊसाहेब उडानशिवे म्हणाले, “अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत एसआयआरचे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. नागरिक रोजंदारीच्या कामासाठी बाहेर असल्याने त्यांना भेटणे कठीण होते. त्यातच एसआयआर संदर्भात अनेक अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत अफवांचे निरसन करून नागरिकांचा विश्वास संपादन करणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. मात्र बीएलओ महेश क्षीरसागर आणि आसाराम गुंड यांनी नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार पहाटे आणि रात्री भेटी देत अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सेवाभावाने काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे रामवाडीतील सुमारे ८० टक्के एसआयआरचे काम पूर्ण झाले आहे.”
यावेळी रामवाडीतील नागरिकांच्या वतीने बीएलओ महेश क्षीरसागर आणि आसाराम गुंड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी मनोहर चाखले, बाळुराम खुडे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही बीएलओंच्या लोकाभिमुख कार्याचे कौतुक करत, अशा संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या योजना आणि लोकशाही प्रक्रिया समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षणासारख्या महत्त्वाच्या लोकशाही प्रक्रियेत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

