• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

लेखक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते गौरव

ByMirror

Aug 17, 2026
मुलींच्या जन्माचे स्वागत आणि स्त्रीशक्तीला समर्पित 101 कवितांचा संग्रह

‘लेक लाडकी’ पुस्तकाला उडान पुरस्कार


मुलींच्या जन्माचे स्वागत आणि स्त्रीशक्तीला समर्पित 101 कवितांचा संग्रह


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी व हिंदी साहित्य क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मितीने वेगळी ओळख निर्माण करणारे अहिल्यानगरचे साहित्यिक तथा सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांच्या ‘लेक लाडकी’ या पुस्तकाला यंदाचा उडान पुरस्कार प्रदान करण्यात आला. 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता पखवाड्यांतर्गत माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय व उडान फाउंडेशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अंदानी यांचा गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमास नगरसेवक पै. महेश लोढे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. अनिता दिघे, शाहीर कान्हू सुंबे, जयश्री शिंदे, रजनी ताठे, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे आदी उपस्थित होते.
‘लेक लाडकी’ या पुस्तकातून स्त्री जन्माचे स्वागत, मुलींच्या जीवनातील विविध भावछटा तसेच बाप-मुलीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी यांचे प्रभावी शब्दांकन करण्यात आले आहे. 101 कवितांचा हा काव्यसंग्रह मुलींसह स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात आला आहे. या साहित्यकृतीतील भावस्पर्शी आशय आणि सामाजिक संदेशाची दखल घेत प्रा. अंदानी यांना उडान पुरस्काराने गौरविण्यात आले.


सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी व हिंदी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद झाली असून एकाच दिवशी 106 स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. तसेच ‘आई’ या विषयावर आधारित 5 हजार 121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. आजवर त्यांच्या 12 हजार 100 हून अधिक कविता विविध ग्रंथांमधून प्रकाशित झाल्या आहेत.


मराठी साहित्य क्षेत्रातही त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकलने प्रकाशित केली आहेत. ‘वडील : बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या संकलनात महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1 हजार 161 कवितांचा समावेश आहे. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या संग्रहातून बहिणीवरील 1 हजार 161 कवितांना स्थान देण्यात आले आहे. ‘भाऊवरील 101 कविता’ या काव्यसंग्रहातून भाऊ-बहिणीतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी व भावबंध प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना यंदाचा ग. दि. माडगूळकर काव्य पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.


सीए (डॉ.) प्रा. अंदानी यांच्या साहित्यिक कार्याची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांसारख्या संस्थांनी घेतली असून त्यांच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. साहित्यसेवेबरोबरच त्यांनी समाजसेवेची परंपराही जपली आहे. मंदिरे, मस्जिद, चर्च, धर्मशाळा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांना अत्यल्प मानधनात किंवा विनामूल्य लेखा, कर व आर्थिक सल्लागार सेवा देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ‘लेक लाडकी’ या पुस्तकाला मिळालेल्या उडान पुरस्काराबद्दल सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांचे साहित्यिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *