लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देत केला सन्मान;
‘वंचित समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’ -आमदार अमित गोरखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चासाठी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे हे अहिल्यानगरात दाखल झाले असता, हिंदू मातंग समाजाच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला. सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा गौरव करत समाजबांधवांनी त्यांना क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले.
स्वागत समारंभात उपस्थित युवकांनी घोषणाबाजी करत सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या लढ्याला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार अमित गोरखे यांनी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, पंडितजी खुडे, केतकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश घोरपडे, अहिल्यानगर उत्तर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, महा भारत न्यूजचे संपादक भारत पवार, नवनाथ वाल्हेकर, प्रकाश वाघमारे, जय नेटके यांच्यासह हिंदू मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक कार्याचा आणि समाजजागृतीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजातील वंचित घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उपस्थित समाजबांधवांनी उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी होणाऱ्या पुढील आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार अमित गोरखे म्हणाले की, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न हा कोणत्याही एका समाजाचा नाही, तर सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांचा प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, समान संधी मिळावी आणि विकासाची समान वाट उपलब्ध व्हावी, ही भूमिका मांडली आहे. मात्र आजही अनेक समाजघटक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्या आणि सामाजिक-शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल. त्यामुळे काही समाजांवर अन्याय न होता प्रत्येक घटकापर्यंत आरक्षणाचे आणि विकास योजनांचे लाभ पोहोचतील. हा संघर्ष कोणाच्या विरोधात नसून न्यायासाठी आहे. तर सर्वांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आपण हा लढा लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

