• Wed. Nov 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

तांदळी दुमालात विकासकामांना वेग!

ByMirror

Nov 25, 2026
मूलभूत सुविधांनी वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार!

तीन वस्त्यांवर सिंगल फेज स्ट्रीट लाईटचे काम मार्गी; १० लाखांची विकासकामेही पूर्ण


सरपंच संजय निगडे यांच्या विकासदृष्टीला आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सहकार्याची जोड


मूलभूत सुविधांनी वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची एकजूट आणि प्रशासनाचे नियोजनबद्ध कामकाज या समन्वयातून तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) गावाच्या विकासाला गती मिळत आहे. लोकनियुक्त सरपंच संजय निगडे (आण्णा) यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने गावातील मूलभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, विविध शासकीय निधींचा योग्य विनियोग करून विकासकामे मार्गी लावली जात आहेत. याच विकासात्मक वाटचालीत गावातील तीन वस्त्यांवर सिंगल फेज स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, क्षीरसागर वस्तीतील विकासकामही पूर्ण करण्यात आले आहे असून, या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
या कामांमुळे गावातील वस्त्यांमध्ये सुविधांचा विस्तार होण्याबरोबरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तांदळी दुमाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून चार लाख रुपयांच्या खर्चाची विद्युत सुविधांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानुसार साळुंखे वस्ती, कचरे वस्ती आणि खुरांगे वस्ती या तीन वस्त्यांवर सिंगल फेज स्ट्रीट लाईटची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे यापूर्वी रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागणाऱ्या नागरिकांना आता प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.


गावाच्या विकासासाठी तालुक्याचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांचेही सातत्याने सहकार्य लाभत आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नातून दलित वस्ती सुधारणा निधीअंतर्गत क्षीरसागर वस्तीकरिता दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून प्रस्तावित विकासकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे क्षीरसागर वस्तीतील नागरिकांनाही आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील विविध वस्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन निधी मिळविणे आणि मंजूर कामे प्रत्यक्षात पूर्ण करणे, या दृष्टीने ग्रामपंचायतीने केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहेत.


गावाच्या विकासासाठी लोकनियुक्त सरपंच संजय निगडे (आण्णा) यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गावातील प्रत्येक वस्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत, नागरिकांच्या दैनंदिन समस्या मार्गी लागल्या पाहिजेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळाला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी विकासकामांचे नियोजन केले आहे. केवळ विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यापुरते मर्यादित न राहता त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेणे, संबंधित लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणे आणि कामे पूर्ण होईपर्यंत त्यावर लक्ष ठेवणे, अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू आहे.


या कामांसाठी उपसरपंच झुंबर खुरांगे, ग्रामपंचायत सदस्य तुषार धावडे, रामदास गंगाधरे, सदस्या पती नर्सिंग भोस, पै. महेश भोस, संतोष हराळ, संतोष बोरुडे आणि प्रवीण काळेवाघ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे विविध कामांना गती मिळाली. सरपंचांच्या नेतृत्वाखाली सक्षम टीमने केलेल्या समन्वयपूर्ण कामकाजामुळे विकासकामे प्रत्यक्षात उतरविणे शक्य झाले आहे.


तांदळी दुमाला गावाच्या विकासात्मक वाटचालीत ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती काळंगे मॅडम यांचे योगदानही विशेष उल्लेखनीय ठरत आहे. गावाच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करणे, ते शासनदरबारी सादर करणे, मंजुरीसाठी आवश्यक पाठपुरावा करणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पदाधिकारी व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, अशा जबाबदाऱ्या त्या नियोजनपूर्वक पार पाडत आहेत.
शासनाच्या नव्या योजनांचा लाभ गावाला मिळावा आणि उपलब्ध निधीचा प्रभावीपणे वापर व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.


तांदळी दुमाला गावाच्या विकासासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी वेळोवेळी सहकार्य करून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे गावातील मूलभूत सुविधांच्या कामांना चालना मिळाली आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *