• Tue. Apr 28th, 2026

कर्मवीर प्रबोधिनी प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे यश

ByMirror

Apr 27, 2026

पाच विद्यार्थी संस्थेच्या गुणवत्ता यादीत चमकले


अनुष्का धामणे व आदित्य औटी अव्वल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्मवीर प्रबोधिनी प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप उमटवली आहे. या परीक्षेत शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी संस्थेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली.


इयत्ता चौथीतील कुमारी अनुष्का धामणे आणि चि. आदित्य औटी यांनी प्रत्येकी 96 गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. चि. वेदांत राहींज आणि चि. आयुष सोनमाळी यांनी 95 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर चि. सरफराज शेख यांनी 94 गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी 5 हजार, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी 3 हजार आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्याने 2 हजार रुपयाचे बक्षिस मिळवले.


या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, डॉ. निक्रड, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, पालक संघाचे सदस्य कैलास गुंजाळ तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जयश्री खांदोडे आणि शितल रोहकले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे विभागीय अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे तसेच लाइफ मेंबर सदस्य शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *