• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा उत्साहात

ByMirror

Feb 6, 2026
विजेते संघ व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

नगर तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग


विजेते संघ व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर), चास व हिंगणगाव या ठिकाणी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, गोळा फेक, धावणे आदी मैदानी स्पर्धांनी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.


चास येथील श्री नृसिंह विद्यालयात झालेल्या स्पर्धांचे उद्घाटन उपशिक्षक विजय देवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, आशिष आचारी, आप्पासाहेब कदम, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, दिपक ठाणगे आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात आयोजित स्पर्धांचे उद्घाटन मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्या हस्ते झाले असून, याच वेळी विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. हिंगणगाव येथे एव्हरेस्ट करिअर अकॅडमीमध्ये झालेल्या स्पर्धांचे उद्घाटन पोपट सोनवणे यांच्या हस्ते पार पडले.
स्पर्धांदरम्यान खो-खो, कबड्डी, गोळा फेक व धावणे या प्रकारांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या. विजयी व उपविजयी संघ तसेच वैयक्तिक खेळाडूंना स्मृतीचिन्हे, मेडल व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेते संघ आणि खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे यांनी सांगितले की, निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी मैदानाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर संपदा हीच खरी संपत्ती असून, दररोज किमान काही वेळ मैदानी खेळ खेळले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शालेय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रमेश गाडगे यांच्यासह आयोजक, शिक्षक व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *