कायद्याचे पालन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी -पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य
चर्मकार समाजाच्या विविध सामाजिक व कायदेशीर प्रश्नांवर चर्चा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य यांचे चर्मकार विकास संघाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. समाज आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा सदिच्छा भेटीचा कार्यक्रम पार पडला.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, खजिनदार अरुण गाडेकर, युवा शहराध्यक्ष विनोद कांबळे, जय गायकवाड, कदम मेजर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत चर्मकार समाजासमोरील विविध सामाजिक, शैक्षणिक, कायदेशीर व नागरी प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. समाजातील युवकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करणे, सामाजिक सलोखा वाढविणे, महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच नागरिक व पोलिस यांच्यात विश्वासाचे वातावरण अधिक दृढ करण्यासाठी पुढाकार राहणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.
पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य म्हणाले की, “समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय जितका मजबूत असेल, तितक्या प्रभावीपणे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येईल. पोलिस प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठीच असून, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “समाज आणि पोलिस यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे. चर्मकार विकास संघ सामाजिक कार्य सातत्याने कार्य करत आहे. भविष्यातही समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी पोलिस प्रशासनासोबत समन्वयाने काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी पोलिस उपनिरीक्षक बालाजी वैद्य यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये परस्पर सहकार्याची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

