• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व शिक्षिका सीमा गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ByMirror

May 21, 2026
31 मे रोजी नाशिक रोड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान

सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल


31 मे रोजी नाशिक रोड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था व सत्‌ कबीर बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे आणि उपक्रमशील शिक्षिका सीमा रामराव गायकवाड यांना “महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 मे रोजी नाशिक रोड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही सातत्याने सुरू आहे.


महिला बचत गट मेळावे, युवा संमेलने, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून ग्रामीण समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच चार ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


दरम्यान, सीमा रामराव गायकवाड या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी, ता. मानोरा (जि. वाशिम) येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्या सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक व डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी त्या विशेष प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले असून विविध शैक्षणिक उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.


उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान सुरु आहे. शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांनाही “महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पै. नाना डोंगरे आणि सीमा गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *