• Fri. May 22nd, 2026

गृहउद्योजिका मीरा बेरड यांना ‘परिणीता सन्मान 2026’ प्रदान

ByMirror

May 21, 2026

फूड प्रोडक्ट्‌सच्या माध्यमातून महिलांना रोजगार; अहिल्यानगरच्या उद्योजिकेचा गौरव


स्वयंसहाय्यता समूहातून उभा केला यशस्वी गृहोद्योग; देशविदेशात पोहोचले उत्पादन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गृहउद्योजिका मीरा बाळासाहेब बेरड यांना खारघर, नवी मुंबई येथे परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘परिणीता सन्मान 2026’ प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मीरा बेरड यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.


लिटिल वर्ल्ड मॉल, खारघर (नवी मुंबई) येथील बॅन्क्वेट हॉलमध्ये झालेल्या भव्य सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपट निर्मात्या अमृता राव, मानसी इंगळे, मधुराज बिल्डर्सचे मधु पाटील, ईपीआरच्या संचालिका अपर्णा शाह यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून महिला उद्योजिकांचा गौरव केला.


नगर तालुक्यातील दरेवाडी गावच्या रहिवासी असलेल्या मीरा बेरड यांनी स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून स्वतःचा ‘अमृत फूड प्रोडक्ट्‌स’ हा गृहोद्योग सुरू केला. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून सुरू झालेला हा व्यवसाय आज यशस्वी उद्योगात परिवर्तित झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन करून बाजारपेठेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहेत.


मीरा बेरड यांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभे केले आहे. या उद्योगामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. केवळ रोजगारच नव्हे, तर महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे कामही त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून अनेक महिलांनी लघुउद्योग क्षेत्रात पाऊल टाकले असून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.


‘अमृत फूड प्रोडक्ट्‌स’ अंतर्गत तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या उत्पादनांना मागणी असून आता हे पदार्थ देशविदेशातही पाठवले जात आहेत. स्थानिक स्तरावर सुरू झालेला व्यवसाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने नगर जिल्ह्याच्या उद्योजकतेला नवी ओळख मिळाली आहे.


कोरोना काळात अनेक महिलांचे उद्योग अडचणीत आले होते. अशा उद्योजिकांना प्रोत्साहन आणि सहाय्य मिळावे या उद्देशाने परिणीता सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमध्ये या संस्थेच्या सदस्या कार्यरत असून महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे, असे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे. मीरा बेरड यांना मिळालेल्या या सन्मानामुळे विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *