• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्रीराम विद्यालय राळेगणच्या मुख्याध्यापिका तारका भापकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

Dec 14, 2024
तारका भापकर बहुआयामी व्यक्तिमत्व -रामचंद्र दरे

तारका भापकर बहुआयामी व्यक्तिमत्व -रामचंद्र दरे

नगर (प्रतिनिधी)- इंग्रजी सारख्या विषयाचे अध्यापन करताना मुख्याध्यापिका तारका भापकर यांनी गुणवंत विद्यार्थी घडविले. त्या स्वतः गायनाची परीक्षा उत्तीर्ण असल्याने विद्यार्थ्यांना गायनाचे धडे दिले. अध्यापना व्यतिरीक्त मिळणाऱ्या वेळेत पतीच्या गोशाळेला तन-मन-धनाने मदत केली. रंगतारा ग्रंथाचे लेखन व त्यास मिळालेल्या पुरस्कारामुळे ज्ञानदानाबरोबरच इतर क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे तारका भापकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते, असे मत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी व्यक्त केले.


34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या तारका भापकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त राळेगण येथे त्यांच्या गौरव समारंभात दरे बोलत होते. तारका भापकर यांचे अध्यापनाबरोबर प्रशासन उत्तम होते. श्रीराम विद्यालयाने मिळविलेले शासनाचे फाईव्ह स्टार मानांकन, शिष्यवृत्त्ती परीक्षा एन.एम.एम.एस. मधील गुणवत्तापूर्ण कामगिरी व मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेतील सलग दोन वर्षे मिळविलेले बक्षीसे यामुळे विद्यालयाची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे मत संस्थेचे सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे यांनी व्यक्त केले. यावेळी आठरे पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शाळा पुरस्कारासाठी श्रीराम विद्यालयाची निवड यावेळी करत असल्याची घोषणा त्यांनी केली.


17 वर्षांपासून विद्यालयाचा सातत्यपूर्ण 100 टक्के निकाल, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्युच्य कामगिरी यामुळे संस्थेने विद्यालयाच्या सर्व भौतिक सुविधांच्या मागणीची पूर्तता त्वरेने केली. गुणवत्तेची ही परंपरा तारका भापकर यांनी तशीच पुढे चालू ठेवून शाळेचा नावलौकिक वाढवला असे जी.डी. खानदेशे म्हणाले. स्व. माधवरावजी मुळे यांचे शाळा उभारणीपासून राळेगण शाळेकडे बारकाईने लक्ष होते. येथील शिक्षक उच्च विद्याभूषित व परिसरातीलच असल्याने गुणवत्ता निर्माण केली व तारका भापकर यांनी या गुणवत्तेत वाढ करून परंपरा टिकविल्याचे मत मुकेशदादा मुळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव जयवंतराव वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव विश्‍वासराव आठरे यांच्या शुभहस्ते भापकर पती-पत्नींचा सत्कार करण्यात आला.


सेवापूर्ती कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कोतकर यांनी केले. विजय जाधव, संजय भापकर, कैलास गुंड यांनी त्यांच्या कार्याचा परिचय व कार्याची माहिती करून दिली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे, ज्येष्ठ विश्‍वस्त जी. डी. खानदेशे, सहसचिव जयवंतराव वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, विश्‍वस्त मुकेशदादा मुळे, वित्त व लेखा अधिकारी रमेश कासार, मा. शिक्षणाधिकारी रामदास हराळ, बाजार समितीचे संचालक सुधीर भापकर, विस्तार अधिकारी नंदा माने, भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे, समाजसेवक राजाराम भापकर, सरपंच दिपाली भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, शरद कोतकर, अनिल पिंपळे, पांडुरंग गोरे, विविध शाखा शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ दरेकर, राजश्री जाधव, सुजय झेंडे, निळकंठ मुळे, आकाश मनवरे, रामदास साबळे, बाळासाहेब कुताळ, अरविंद कुमावत, विशाल मुळे, आकांक्षा शेलार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले. आभार निळकंठ मुळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *