• Sun. May 31st, 2026

न्यायप्रविष्ट जागेवरील शाळेची तोडफोड; संस्थाचालक महिलेचा पोलिसांकडे धाव

ByMirror

May 30, 2026

टाकळी खातगाव येथील समता शैक्षणिक संस्थेतील शाळा पाडल्याचा आरोप; जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार


11 वर्षांपासून सुरू असलेल्या शाळेवर अचानक कारवाई; 100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील समता शैक्षणिक संस्थेच्या शाळेची न्यायालयीन वाद प्रलंबित असताना बेकायदेशीरपणे तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप संस्थाचालक शकिरा रमजान शेख यांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदविला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


तक्रारदार शकिरा शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी खातगाव येथील गट क्रमांक 39/1 मधील सुमारे 32 गुंठे जागेत मागील 11 वर्षांपासून समता शैक्षणिक संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 100 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था शिक्षणाचे केंद्र बनली आहे.


तक्रारीनुसार, दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास संबंधित गैरतक्रारदारांनी नियोजनपूर्वक शाळेवर धाड टाकून पत्र्याचे शेड, बांधकाम व इतर साहित्याची तोडफोड केली. शाळेमध्ये कोणी नसताना ही कारवाई करण्यात आली. शेजारील व्यक्तीने माहिती दिल्यानंतर तक्रारदार घटनास्थळी पोहोचले असता संबंधित मंडळी शाळा पाडत असल्याचे दिसून आले. यावेळी संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ फुटेज तसेच जाळपोळीचे दृश्‍य रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.


तसेच, शाळा व जागेवरून सुरू असलेला वाद न्यायालयात प्रलंबित असताना कोणत्याही न्यायालयीन आदेशाशिवाय जमाव जमवून जबरदस्तीने शाळेचे नुकसान करण्यात आले. विरोध करण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिला व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा त्यांनी सन 2015 मध्ये नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. अहमदनगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक 3185/2015 व 3850/2015 अन्वये व्यवहार पूर्ण झाला होता. खरेदीखतानंतर जागेचा ताबाही देण्यात आला होता. त्यानंतर शाळेचे बांधकाम करून संस्था सुरू करण्यात आली. मात्र, नंतर जमीन व्यवहारावरून काही नातेवाईकांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.


या प्रकरणात अहमदनगर येथील न्यायालयाने 2019 मध्ये एकतर्फी आदेश दिल्यानंतर तक्रारदारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले असून ते अद्याप प्रलंबित आहे. तसेच संबंधित जागेबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयातही अपील सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदारांनी आरोप केला आहे की, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही महसूल अधिकाऱ्यांची दिशाभूल करून फेरफार रद्द करण्याचे आदेश मिळविण्यात आले. त्यानंतर काही व्यक्तींनी संगनमत करून जागेवर अतिक्रमण करण्याचा व शाळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. “आम्ही पुन्हा येऊ आणि जागा मोकळी करून ताबा घेऊ, पोलिस व कायद्याला घाबरत नाही,” अशी धमकी संबंधितांनी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःच्या जीवितासह कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे शकिरा शेख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जून महिन्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याने शाळेचे मोठे नुकसान झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.



‘वाद न्यायालयात असताना थेट तोडफोड’
न्यायालयीन आदेशाशिवाय कारवाई केल्याचा आरोप; महिला संस्थाचालक भयभीत
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना कोणालाही स्वतःहून ताबा घेण्याचा किंवा तोडफोड करण्याचा अधिकार नाही. तरीदेखील संबंधितांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून शाळेचे नुकसान केले. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.



100 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. समता शैक्षणिक संस्थेमध्ये परिसरातील अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची तोडफोड झाल्याने येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे वर्ग कुठे भरवायचे, हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग व प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *