• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

सदगुरू रोहिदासजी प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेतील अपहारप्रकरणी फरार आरोपींना तात्काळ अटक करा

ByMirror

Jul 13, 2026
शोषित शिक्षक-कर्मचाऱ्यांचा न्याय मिळण्यासाठी आक्रोश

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घटानाद आंदोलन; खासदार निलेश लंके यांना संसदेत प्रश्‍न उपस्थित करण्याची मागणी


शोषित शिक्षक-कर्मचाऱ्यांचा न्याय मिळण्यासाठी आक्रोश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सदगुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक अपहार प्रकरणाची सखोल चौकशी करून फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, शोषित शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन आणि संस्थेतील शोषित शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घटानाद आंदोलन व उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला खासदार निलेश लंके यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, तपासातील विलंब आणि फरार आरोपींना अटक न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.


आंदोलकांनी खासदार निलेश लंके यांच्यासमोर काही बँक व्यवहारांचे दस्तावेज सादर करत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली येथे कार्यरत असलेल्या क्षितीज शर्मा व सौ. भारती शर्मा या अधिकाऱ्याच्या खात्यावर संस्थेच्या खात्यातून तसेच संबंधित व्यवहारांद्वारे एकूण सुमारे 60 लाख 50 हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या व्यवहारांचा उद्देश काय होता, संबंधित रकमेचा उपयोग कोणत्या कारणासाठी करण्यात आला आणि या व्यवहारामागील सत्य काय आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच हा मुद्दा संसदेत तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून उपस्थित करावा, अशी विनंतीही त्यांनी खासदार लंके यांच्याकडे केली. यावर संबंधित बाबींचा अभ्यास करून योग्य स्तरावर प्रश्‍न उपस्थित करण्याचे आश्‍वासन खासदार लंके यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनात जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ पाचंगे, जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे, हरेश्‍वर साळवे, रमेश चक्रनारायण, नंदू कोतकर, सचिन भिसे, दीपक गायके, धनंजय शिंदे, विजय गाडेकर, प्रसाद सोनवणे, मच्छिंद्र वांढेकर, अमोल वांढेकर, धनंजय वांढेकर, प्रदीप शिंदे, स्वप्निल ढगे, श्रीकांत कचरे यांच्यासह शोषित शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबेळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.


सदगुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे आणि संचालक संजय बन्सी साळवे हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून मागील आठ महिन्यांपासून अहिल्यानगर उपकारागृहात आहेत. मात्र या प्रकरणातील इतर पाच पदाधिकारी 2019 पासून फरार असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणांनी या फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एका संस्थेतून एवढे पैसे अधिकाऱ्यांना जात असतील, तर देशातील इतर संस्थेतून किती पैसे संबंधित अधिकारी यांना जात असतील. या भ्रष्टाचाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा रघुनाथ आंबेडकर यांनी दिला आहे.


यावेळी स्वर्गीय अनिल शंकर कांबळे यांच्या पत्नी शोभा अनिल कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीकडेही आंदोलकांनी लक्ष वेधले. पाथर्डी पोलीस ठाण्यात 11 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच स्वर्गीय अनिल कांबळे यांच्या निधनानंतरही त्यांच्या नावावर संस्थेतून पगार काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणात संचालक मंडळाची जबाबदारी निश्‍चित करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित विधवा महिलेला न्याय मिळावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
संस्थेच्या पाथर्डी व भिंगार येथील आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 20 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे जीवन या प्रकरणामुळे विस्कळीत झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे केंद्र शासनाच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये समायोजन करण्यासाठी शिफारस करावी, अशी मागणीही खासदार निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली.
याशिवाय संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत उल्लेख करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या बँक खात्याची सीबीआय किंवा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्यामार्फत स्वतंत्र चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *