• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 80 हजारांचे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप

ByMirror

Aug 17, 2026
श्री रेणुका माता देवस्थान नवनागापूर एमआयडीसी ट्रस्टचा उपक्रम

श्री रेणुका माता देवस्थान नवनागापूर एमआयडीसी ट्रस्टचा उपक्रम


‘सामाजिक बदलासाठी शिक्षण हेच सर्वात मोठे सामर्थ्य’ -प्रभाकर भोर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने 80 वा स्वातंत्र्य दिन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने तब्बल 80 हजार रुपये किमतीचे विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून, विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात एमआयडीसी आठरे पाटील बालगृह येथे ध्वजारोहणाने झाली. श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, महेश सप्रे, सचिन कोतकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर आठरे पाटील बालगृह, जिल्हा परिषद नवनागापूर शाळा, गजानन वसाहत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर, पुस्तके तसेच इतर आवश्‍यक शालेय साहित्य देण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.


आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ट्रस्टने हा उपक्रम राबविला. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्‍यक साधने मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला यामुळे निश्‍चितच बळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. केवळ धार्मिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याचा ट्रस्टचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की, शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते. विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनत, शिस्त, सातत्य आणि सकारात्मक विचारांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *