• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ByMirror

Aug 17, 2026
निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पै. नाना डोंगरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांची जिंकली मने


विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम व शिवकालीन युद्धकला खेळाडूंचा सन्मान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच नवनाथ विद्यालय येथे विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन ‘भारत माता की जय’च्या जयघोषात प्रभातफेरी काढली. यावेळी गावातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच किरण जाधव यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी सैनिक कैलास जाधव यांच्या हस्ते, तर नवनाथ विद्यालयात संस्थेच्या सचिव सुमन कुरेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर घोषणा आणि विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला. यशवंत सेना व जय मल्हार संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसरपंच किरण जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायत येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी प्रविण पानसंबळ, सागर कापसे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, गोकुळ जाधव, अण्णा जाधव, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अरुण फलके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन बनकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जाधव, दीपक गायकवाड, संजय कापसे, बाबूराव जाधव, गोरख फलके, मयूर काळे, संदीप गायकवाड, कामगार तलाठी विनायक दीक्षित, चांद शेख, अरुण कापसे, दिलावर शेख, कचरू कापसे, पिंटू जाधव, गोरख फलके, जालिंदर जाधव, डॉ. विजय जाधव, भरत फलके यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपसरपंच किरण जाधव म्हणाले की, निमगाव वाघा गावातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू विविध स्तरांवर पुढे आले आहेत. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ते सातत्याने ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या कार्याला ग्रामपंचायतीचे यापुढेही सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुमन कुरेल यांनी ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावातील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन प्रभातफेरी काढली. ‘भारत माता की जय’ तसेच देशभक्तीपर घोषणांनी गावातील वातावरण भारावून गेले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीते, लेझीम पथकाचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी शिवकालीन युद्धकलेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *