• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

ByMirror

Aug 17, 2026
चित्रकला व निबंधातून सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करण्याची गरज -सुधीर लंके

5 हजार 521 स्पर्धकांच्या सहभागाने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार


चित्रकला व निबंधातून सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करण्याची गरज -सुधीर लंके


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षणमहर्षी स्व. माधवरावजी मुळे तथा ‘आबा’ यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 5 हजार 521 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. विशेषतः निबंध स्पर्धेच्या खुल्या गटात शालेय शिक्षक, प्राध्यापक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


न्यू टिळक रोड येथील सरदार पटेल मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे होते. ज्येष्ठ संपादक सुधीर लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश (दादा) मुळे, उपाध्यक्ष प्राचार्य दत्ता पाटील नारळे, सचिव प्राचार्य डॉ.एम. एम. तांबे, खजिनदार बजरंग पाडळकर, डॉ. महेश मुळे, प्रा. लालचंद हराळ, मीनाताई पोटे, प्रा. गणेश भगत, निलेश काळदाते, सुनील म्हस्के, महेश मुळे यांच्यासह प्राचार्य, मुख्यध्यापक ,विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. एम. एम. तांबे यांनी प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, स्व. माधवराव मुळे यांच्या विचाराप्रमाणे प्रतिष्ठानचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर विचाराने सुरू आहे. हाच वैचारिक वारसा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचे काम प्रतिष्ठान करीत आहे. समाजवादी विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा आणि समाजातील समस्यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला की, परीक्षकांना परीक्षणासाठी 15 ते 20 दिवस लागले. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे स्पष्ट करून त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.


चित्रकला स्पर्धेचे परीक्षण करणारे कलाशिक्षक शारदा साठे, निलेश गणगले, मनीषा कदम, सचिन सांगळे, नारायण शेळके व अली चंद्रकांत तसेच निबंध स्पर्धेचे परीक्षक सविता सानप, प्रीती प्रभुणे, जयश्री देशपांडे, दत्तात्रय नकुलवाड, सुप्रिया पागिरे-वाळके व प्रा. गणेश भगत यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धक वैशाली मंगलाराम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या स्पर्धेमुळे सुप्त कलागुणांना वाव मिळाला. कला सादर करण्याची संधी मिळाली. उत्तम नियोजन व पारदर्शकता या स्पर्धेतून अनुभवता आल्याचे सांगितले.


ज्येष्ठ संपादक सुधीर लंके म्हणाले की, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत आबांचे योगदान मोठे आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचार घेऊन त्यांनी कार्य केले. समाजात निर्माण झालेले सध्याचे प्रश्‍न शाहू, फुले, आंबेडकर समजून घेतले तर प्रश्‍न उद्भवणार नाहीत. हे विचार जपणे व पुढे घेऊन जाणे ही लोकांची भूमिका व्हावी. ही भूमिका घेऊन समाजात काम करणे धाडसाचे काम आहे. समाजात सध्या बोलणे आणि लिहिणे अवघड झाले असून त्यावर निर्बंध येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. कला जीवनाचा दृष्टिकोन बदलते. निबंधाच्या शब्दात मोठी ताकद आहे आणि तो इतिहास निर्माण करतो. यावेळी त्यांनी मुक्ता साळवे व ताराबाई शिंदे यांचा संदर्भ दिला. निबंध समाजव्यवस्थेवर भाष्य करतो आणि विचार करायला शिकवतो. चित्रकला विचार उमटवते व समाजजागृतीचे काम करते. याबाबत त्यांनी आर. के. लक्ष्मण यांचे संदर्भ दिले. समाजात विद्वानांना किंमत कमी आणि राजकीय व्यक्तींना प्रतिष्ठा मिळाली आहे. कलाकार समाजातील दुर्गुणांवर भाष्य करतो. आज समाजात रंग महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सुधीर लंके यांनी सांगितले.


माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, भावार्थ व विचार निबंध आणि चित्रकलेतून मांडता आला पाहिजे. चित्रकला व निबंधामध्ये कल्पनाशक्ती आणि बौद्धिक कुतूहल ही साम्याची गोष्ट आहे. हिटलरला निबंधातून उत्तर मिळाले. सध्या अनावश्‍यक निर्बंध लादले जात आहेत. वैचारिक निबंधातून त्याला उत्तर द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. निमसे यांनी स्व. माधवराव मुळे यांच्याशी असलेले आपले वैयक्तिक नातेही उलगडले. नवनिर्मितीची उर्मी घेऊन आबांनी काम केले आणि संस्थेचा पाया रचला. प्राचार्यांच्या कामात त्यांनी ढवळाढवळ केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार दत्ता पाटील नारळे यांनी मानले.



जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल:-
चित्रकला स्पर्धा
इयत्ता पहिली ते दुसरी गट : प्रथम- श्रेयांश अभिषेक मरकड (महाराष्ट्र बालक मंदिर), द्वितीय- यशांजली संतोष टिमकरे (महाराष्ट्र बालक मंदिर), इर्शिता ऋषिकेश खंडागळे (समर्थ विद्या मंदिर), तृतीय- शिवराज संतोष फंड (नूतन मराठी शाळा), उत्तेजनार्थ – रुद्र महेश चिपोले (आनंद विद्यालय), प्रान्शी योगेश जगताप (केंद्रीय विद्यालय, दरेवाडी).
इयत्ता तिसरी ते चौथी गट : प्रथम- आरोही अमृत जुंबड (नूतन मराठी प्राथमिक शाळा), द्वितीय- विनय विशाल गांधी (पोदार इंटरनॅशनल स्कूल), तृतीय- गार्गी अक्षय आकडे (आनंद विद्यालय), उत्तेजनार्थ- पायल निलेश पवार (श्री समर्थ विद्या मंदिर), मयुरी गणेश सुपेकर (वि. ल. कुलकर्णी विद्यालय).
इयत्ता पाचवी ते सातवी गट :
प्रथम- संचित नामदेव कुलट (रेसिडेन्शिअल हायस्कूल), द्वितीय- रुद्र प्रशांत कार्ले (श्री शाहू विद्या मंदिर, खडांबे), पृथ्वीराज मुकुंदा मोढवे, तृतीय- आश्‍व संदिप पवार (जनता विद्यालय, रुईछत्तीसी), उत्तेजनार्थ- अवनी किशोर चेमटे (श्री समर्थ विद्या मंदिर), श्रावणी सुनील लांडगे (नवभारत विद्यालय, देहरे).
निबंध लेखन स्पर्धा
इयत्ता आठवी ते दहावी गट : प्रथम- क्रमांक विभागून देवीका महेश साळुंके (रेसिडेन्शिअल हायस्कूल), इनामदार आलिया महेबूब (मुलिका देवी विद्या मंदिर, निघोज), द्वितीय- क्रमांक विभागून श्रीशा प्रसाद सोनवणे (रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगाव), रित्विका भाऊसाहेब गोंडगिरे (समर्थ विद्या मंदिर, नगर), तृतीय- श्रावणी प्रभाकर काकडे (मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ- मृणाली मुटकुळे (भारतीबाबा विद्यालय, चिकणी), ज्ञानेश्‍वरी दिगंबर तोडमल (नवभारत विद्यालय, देहरे).
महाविद्यालयीन गट (इयत्ता अकरावी ते पदवी) : प्रथम – माधुरी कैलास जगताप (यशवंतराव चव्हाण कॉलेज, वांबोरी), द्वितीय- नचिकेत दत्तात्रय पवार (न्यू आर्ट्‌स कॉलेज), तृतीय- प्रतीक्षा विलास फटांगरे (बाळेश्‍वर उच्च माध्यमिक, सारोळे पठार), उत्तेजनार्थ- सरिका रमेश टिळेकर (मलिकादेवी, निघोज), सिद्धी प्रवीण पंडित (रचना कला महाविद्यालय).
खुला गट : प्रथम- वैशाली एकनाथ मंगलारम (महाराष्ट्र बालक मंदिर), द्वितीय- आरती सुनील मांढरे (न्यू आर्ट्‌स कॉलेज), तृतीय- सायली देवराम घुले (श्री बाळेश्‍वर उच्च माध्यमिक विद्यालय), उत्तेजनार्थ ज्योती संतोष जाधव (न्यू आर्ट्‌स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर), लीना अशोक बंगाळ (समर्थ विद्या मंदिर, नगर).

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *