• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

उपांत्यपूर्व सामन्यांत फुटबॉलचा थरार; सेंट मायकल, आर्मी व प्रवरा स्कूलचा दमदार विजय

ByMirror

Aug 17, 2026
आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला रंगत

आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला रंगत


आठरे पाटील स्कूलचा सलग तीन वर्षांचा विजेतेपदाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारी (दि. 17 ऑगस्ट) फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये खेळाडूंनी आक्रमक चाली, वेगवान पासिंग, भक्कम बचाव आणि गोल करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी सामन्यांमध्ये चांगलीच रंगत आणली. काही सामने निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला, तर काही सामन्यांत विजयी संघांनी गोलांची बरसात करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्‍चित केले.


12 वर्षांखालील मुलांच्या गटात ओएसीस इंग्लिश मीडियम स्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही संघांच्या बचावफळीने उत्तम कामगिरी केल्याने निर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामना 0-0 गोलने बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरवर नेण्यात आला. टायब्रेकरमध्ये ओएसीसकडून सुरज सातपुते याने एक गोल केला. सेंट मायकल स्कूलकडून सारांश, नवनीत आणि सोहम यांनी प्रत्येकी एक गोल करत तीन गोल नोंदविले. अखेर सेंट मायकल स्कूलने 3-1 गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.


14 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेंट मायकलच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. अनिश झांजे याने सामन्याच्या 8 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर 13 व्या मिनिटाला इशान पठारे याने गोल करत सेंट मायकलची आघाडी वाढविली. दुसऱ्या सत्रातही सेंट मायकलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवला. 45 व्या मिनिटाला शौर्य चंगेडिया याने गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंट मायकलच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलला शेवटपर्यंत एकही गोल करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे सेंट मायकल स्कूलने 3-0 गोलने दणदणीत विजय मिळविला.


16 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि सेंट मायकल स्कूल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी मैदानावर दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्याला गोल करण्याची संधी मिळू नये यासाठी बचावात्मक खेळीवर भर दिला. सेंट मायकलकडून माहिर गुंदेचा याने 16 व्या मिनिटाला अचूक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र सेंट मायकलच्या बचावफळीने भक्कम भिंत उभी करत आठरे पाटीलला एकही गोल करता दिला नाही. माहिरचा हा एकमेव गोल सेंट मायकलच्या विजयासाठी निर्णायक ठरला आणि संघाने 1-0 गोलने सामना जिंकला. विशेष म्हणजे, या गटात सलग तीन वर्षे विजेतेपद पटकाविणाऱ्या आठरे पाटील पब्लिक स्कूलला यंदा उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्पर्धेतील या निकालाने फुटबॉलप्रेमींमध्ये आश्‍चर्य व्यक्त झाले.


16 वर्षांखालील मुलांच्या गटातील आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल आमनेसामने आले. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच सावध आणि आक्रमक खेळाचे संतुलन साधले. आर्मी पब्लिक स्कूलकडून प्रतिक शेळके याने 20 व्या मिनिटाला गोल करत संघाचे पारडे जड केले. आघाडी मिळाल्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी बचावफळी मजबूत ठेवत प्रवरा पब्लिक स्कूलच्या आक्रमणांना यशस्वीपणे रोखले. प्रवरा स्कूलला एकही गोल करता आला नाही. अखेर आर्मी पब्लिक स्कूलने 1-0 गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला.


12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि आठरे पाटील स्कूल यांच्यात रंगलेला सामना शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र निर्धारित वेळेत दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना 0-0 गोलने बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरवर नेण्यात आला. टायब्रेकरमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलकडून वरद चौहान आणि हर्षल पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर आठरे पाटील स्कूलकडून शिवम गांगर्डे, अभिमन्यू आकोडे आणि अर्णव जगताप यांनी प्रत्येकी एक गोल करत तीन गोल नोंदविले. त्यामुळे आठरे पाटील स्कूलने 3-2 गोलने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.


14 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल आणि प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण केला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला वैभव कविटकर याने गोल करत प्रवरा स्कूलचे खाते उघडले. त्यानंतर 13 व्या मिनिटाला रनविजय जुमकर याने गोल करत आघाडी वाढविली. प्रवरा स्कूलचा आक्रमक खेळ यानंतरही कायम राहिला. 15 व्या मिनिटाला धीरज चारसकर याने गोल केला. त्यानंतर त्यानेच 19 व्या मिनिटाला पुन्हा गोल करत संघाची आघाडी आणखी भक्कम केली. 24 व्या मिनिटाला वैभव कविटकरने वैयक्तिक दुसरा गोल करत प्रवरा पब्लिक स्कूलला 5-0 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. उर्वरित सामन्यात आठरे पाटील स्कूलने गोल करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र प्रवरा स्कूलच्या बचावफळीसमोर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर प्रवरा पब्लिक स्कूलने 5-0 गोलने एकतर्फी विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यांनंतर विजयी संघांनी उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला असून, स्पर्धेतील पुढील सामने अधिक चुरशीचे होण्याची अपेक्षा आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *