• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण समितीत सविता मोरे यांची नियुक्ती

ByMirror

May 13, 2026
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण व सल्लागार समितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सविता मोरे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दिलीप भालसिंग, बाबासाहेब सानप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


राज्य शासनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने संनियंत्रण व सल्लागार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये विविध विभागांतील अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, रुग्णालयातील सेवा, सुविधा, प्रशासन आणि रुग्णांच्या समस्या यावर प्रभावीपणे लक्ष ठेवण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
समिती मधील सदस्य जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, वैद्यकीय यंत्रणेचे कामकाज तसेच नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत करणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, शासकीय योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा आणि रुग्णालयातील व्यवस्थापन अधिक गतिमान व्हावे यासाठी ते सक्रिय भूमिका बजावणार आहेत.


सविता मोरे या मागील 15 ते 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, वंचित घटकांचे प्रश्‍न, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. भाजपमध्ये त्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून, संघटनात्मक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे.


शासनाच्या निर्देशानुसार या समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील किरकोळ तसेच गंभीर समस्यांवर तातडीने निर्णय घेणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समितीत विविध विभागांचे अधिकारी सहभागी असल्याने प्रशासकीय अडचणी दूर करण्यास गती मिळणार असून, आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.


सविता मोरे यांच्या निवडीबद्दल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील तसेच विनायक देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

–—–
“जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण व सल्लागार समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मनःपूर्वक आभारी आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्याला वेळेवर उपचार, स्वच्छ वातावरण, औषधे आणि योग्य सुविधा मिळणे अत्यंत आवश्‍यक आहे. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्या सोडविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, गरीब व वंचित घटकांना आरोग्यसेवा मिळविताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्नशीलपणे काम केले जाणार आहे. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. -सविता मोरे (भाजप, उपाध्यक्ष)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *