• Thu. May 14th, 2026

जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण समितीत दत्ता गाडळकर यांची नियुक्ती

ByMirror

May 13, 2026

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील -दत्ता गाडळकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या संनियंत्रण व सल्लागार समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नगरसेवक तथा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गाडळकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दिलीप भालसिंग, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते.


जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, प्रभावी व रुग्णाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने संनियंत्रण व सल्लागार समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये विविध विभागांतील अधिकारी तसेच अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, रुग्णालयातील समस्या, सुविधा आणि प्रशासनातील अडचणी सोडविण्यासाठी समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


दत्ता गाडळकर यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय यंत्रणा, नागरिकांच्या तक्रारी तसेच सर्वसामान्य रुग्णांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून आरोग्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव समितीच्या कामकाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


शासनाच्या निर्देशानुसार समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील किरकोळ तसेच महत्त्वाच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेणे, आवश्‍यक समन्वय साधणे आणि रुग्णांना वेळेवर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विविध विभागांतील अधिकारी समितीत असल्यामुळे प्रशासकीय अडचणी दूर करण्यास गती मिळणार असून, आरोग्य सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता निर्माण होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दत्ता गाडळकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या विकासकामांना चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.


दत्ता गाडळकर म्हणाले की, “जिल्हा रुग्णालयाच्या संनियंत्रण व सल्लागार समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी राज्य शासन तसेच पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.


या नियुक्तीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांचे विशेष आभार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात औषध उपलब्धता, स्वच्छता, रुग्णसेवा, सुविधा आणि व्यवस्थापन या बाबींवर विशेष लक्ष देऊन रुग्णालय अधिक सक्षम करण्यासाठी समितीमार्फत काम केले जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *