• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

नाईट स्कूलमध्ये रंगले स्नेहसंमेलन

ByMirror

Dec 24, 2024
सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण

सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण

नगर (प्रतिनिधी)- दिवसभर कष्ट करणाऱ्या हातांना शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या शहरातील नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. विविध कारणांनी अर्धवट शिक्षण सोडल्यानंतर नाईट स्कूलच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल केली. हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता.


वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सोमनाथ जाधव, नाईट स्कूलचे माजी विद्यार्थी तथा माजी नगरसेवक अनिल शेकटकर, संस्थेचे मानद सचिव निलेश वैकर, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, शाळा समितीचे अध्यक्ष विजय देवचके, मंगेश धर्माधिकारी आदींसह विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य व नाईट स्कूलचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल शेकटकर म्हणाले की, संयम आणि गती ही यशाची दोन चाके आहेत. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. नाईट स्कूलचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. नाईट शाळेत विद्यार्थी कष्ट करुन शिक्षण घेऊन भवितव्य घडवत असल्याचे त्यांनी सांगितले.


निलेश वैकर म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व पटलेले विद्यार्थी रात्र प्रशाळेत येतात. कष्ट करुन शिक्षण घेणाऱ्यांचे कौतुक वाटते. जीवनात फक्त हुशारी कामाला येत नाही, कष्ट, अनुभव याची सांगड घालून यश प्राप्त होते. कष्ट करून पुढे जाता येणार नाही, कष्टाला शिक्षणाची जोड द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.


पाहुण्यांचा परिचय देवका लबडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले. आभार सुषमा धारूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीणा कुऱ्हाडे, राजू भुजबळ, मासूम संस्थेचे स्कूल लीडर महेंद्र म्हसे यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *