• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

अलिबागमध्ये राजेश खर्डे वेसावकर यांना ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’

ByMirror

Apr 18, 2026
अलिबागमध्ये राजेश खर्डे वेसावकर यांना ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’

अवधूत गुप्ते व रोहित पाटील यांच्या हस्ते गौरव

वेसावकर यांनी कोळी संस्कृतीचा झेंडा देशभर फडकविला -विजय भालसिंग

अलिबाग (प्रतिनिधी) – अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित भव्य सोहळ्यात मुंबई येथील श्री राजेश खर्डे वेसावकर यांना ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे, अलिबाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या वेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी राजेश खर्डे यांच्या कलाक्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव केला.
तीन दशकांचा कलाप्रवास; नृत्यदिग्दर्शनातून देशभर ठसा
राजेश खर्डे वेसावकर यांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून नृत्यदिग्दर्शन, अभिनय, गीतलेखन व दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत भारतातील विविध लोकनृत्यांना नवे आयाम दिले.


“वेसावची पारू”, “परंपरा वेसावकरांची”, “टिपा ऑर्केस्ट्रा”, “गंध मराठी मातीचा” अशा विविध बॅनरद्वारे त्यांनी रंगभूमीवर प्रभावी कामगिरी बजावली आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या ‘हाय कोळी’ नृत्याच्या सादरीकरणाचे नृत्यदिग्दर्शनही त्यांनीच केले होते. तसेच ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात नियमित सहभागाची संधी त्यांना मिळाली आहे.


याशिवाय ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अमृता फडवणीस यांच्या ‘रिव्हर’ गाण्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
देशभरात कोळी संस्कृतीचा प्रचार; “फेस्टिवलचा बादशाह” म्हणून ओळख
राजेश खर्डे यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर कोळी समाजाच्या लोकनृत्याचा प्रसार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागासह इंडियन कोस्ट गार्डच्या विविध कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला आहे.


गेल्या 20 वर्षांपासून वेसावा फेस्टिवल, सुरत फेस्टिवल, अहमदाबाद फेस्टिवल, जुहू फेस्टिवल, ट्रॉम्बे फेस्टिवल, उलवे (नवी मुंबई) फेस्टिवल अशा अनेक सांस्कृतिक महोत्सवांमध्ये सातत्याने त्यांनी सादरीकरण केले आहे. त्यामुळेच त्यांना “फेस्टिवलचा बादशाह” अशी ओळख मिळाली आहे.
आजपर्यंत त्यांना कोळी नटसम्राट पुरस्कार, कोळी समाज रत्न पुरस्कार, कोळी रत्नाकर पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत. मात्र ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’ हा त्यांच्या मते सर्वात मोठा सन्मान ठरला आहे.

पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले,
“हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असल्याने माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवप्रेमी संस्थेचे तसेच माझे लहान बंधू व मित्र रोहित पाटील यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
या यशाबद्दल वाळकी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी माहिती देत राजेश खर्डे वेसावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
ते म्हणाले,
“राजेश खर्डे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कोळी संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यातही त्यांच्या कडून अशीच उत्कृष्ट कामगिरी घडत राहो, हीच शुभेच्छा.”

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *