• Tue. Apr 21st, 2026

संजय कांबळे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर

ByMirror

Apr 17, 2026

सामाजिक, धार्मिक आणि बौद्ध धम्म प्रसाराचे कार्य; 34 वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल;

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांना तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक, धार्मिक आणि बौद्ध धम्म प्रसाराच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत आहे.


संगमनेर येथे 6 जून रोजी आयोजित “संविधान अमृत महोत्सव” कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र घोसाळे यांनी दिली.


संजय कांबळे हे गेल्या तब्बल 34 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कांबळे यांनी समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून केली.
यानंतर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून श्रामनेर शिबिरांचे आयोजन करून युवक-युवतींना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी हाती घेतले. बाल शिबिर, महिला शिबिर, समता सैनिक शिबिर, धम्म मेळावे व धम्म परिषदांचे आयोजन करून जिल्ह्यातील बौद्ध धम्म चळवळीला त्यांनी चालना दिली आहे.


तसेच तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या माध्यमातून अनेक गरीब मुला-मुलींचे विवाह लावून देण्याचे तसेच तरुण-तरुणींसाठी निशुल्क विवाह जुळविण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी “धम्म रथ” तयार करून जिल्हाभर जनजागृती सुरू केली आहे. याशिवाय रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून, तिचा संपूर्ण खर्च मंडळ उचलत आहे, हीदेखील एक उल्लेखनीय सामाजिक सेवा ठरली आहे.


विशेष म्हणजे, 2025 पासून त्यांनी साडेसहा फुट उंचीच्या पाच बुद्धमूर्ती दान केल्या असून, भविष्यात 100 बुद्धमूर्ती दान करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत त्यांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026” जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वीही विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला असून, हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या कार्याची पावती आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *