• Tue. Sep 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र दगडखैर

ByMirror

Sep 1, 2026
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., शेवगावच्या चेअरमनपदी अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर (शेवगाव), व्हाईस चेअरमनपदी सय्यद अफसरपाशा (पुणे) आणि मानद सचिवपदी बापूसाहेब जगदाळे (श्रीरामपूर) यांची बिनविरोध निवड

अफसरपाशा व्हाईस चेअरमन, बापूसाहेब जगदाळे मानद सचिव; तिन्ही पदांवर बिनविरोध निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., शेवगावच्या चेअरमनपदी अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर (शेवगाव), व्हाईस चेअरमनपदी सय्यद अफसरपाशा (पुणे) आणि मानद सचिवपदी बापूसाहेब जगदाळे (श्रीरामपूर) यांची बिनविरोध निवड झाली. सर्व संचालकांच्या एकमताने झालेल्या या निवडीमुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


नवीन चेअरमन, व्हाईस चेअरमन व मानद सचिवांच्या निवडीसाठी नुकतीच तांत्रिक भवन, अहिल्यानगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित पदांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. चेअरमनपदासाठी अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर, व्हाईस चेअरमनपदासाठी सय्यद अफसरपाशा तसेच मानद सचिवपदासाठी बापूसाहेब जगदाळे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने आणि सर्व संचालकांनी एकमत दर्शविल्याने तिन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. संस्थेच्या कारभाराची जबाबदारी आता नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार आहे.


ही निवड प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक बाळकृष्ण शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रक्रिया पूर्ण केली. संस्थेचे कार्यकारी संचालक अरुण इंगळे यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सेवकवृंद तसेच सदिच्छा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब भाकरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला असून, संस्थेने लौकिक मिळविला आहे. सभासदांच्या हितासाठी विविध योजना राबविण्याबरोबरच ठेवीदारांसाठीही आकर्षक ठेव योजना राबविण्यात आल्या आहेत. संस्थेचा कारभार उत्तम पद्धतीने सुरू असताना नूतन पदाधिकारीदेखील याच वाटेवरून पुढे जात संस्थेच्या प्रगतीला अधिक गती देतील, असा विश्‍वास भाकरे यांनी व्यक्त केला. सभासदांचे हित, संस्थेची आर्थिक भक्कमपणा आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने नूतन पदाधिकारी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बिनविरोध निवड जाहीर होताच उपस्थित संचालक, पदाधिकारी व सेवकवृंदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर, व्हाईस चेअरमन सय्यद अफसरपाशा आणि मानद सचिव बापूसाहेब जगदाळे यांनी सर्व संचालक व उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीची परंपरा कायम ठेवत सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *