• Sun. Aug 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘अहिल्यानगरची अन्नपूर्णा आजी’ म्हणून मीरा आव्हाड यांचा पीपल्स हेल्पलार्इनच्या वतीने गौरव

ByMirror

Aug 30, 2026
पाचशे विद्यार्थ्यांच्या ताटात रोज वाढतात मायेचे घास

गरजू विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक घरगुती भोजन देणाऱ्या कार्याचा सन्मान


पाचशे विद्यार्थ्यांच्या ताटात रोज वाढतात मायेचे घास


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी घरापासून दूर येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्पदरात पौष्टिक, चवदार आणि घरगुती भोजन उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणप्रवासाला मायेचा आधार देणाऱ्या मीरा भगवान आव्हाड यांच्या सेवाभावी कार्याचा पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा राष्ट्रीय धारणालय’ कार्यक्रमात त्यांना ‘अहिल्यानगरची अन्नपूर्णा आजी’ या सन्मानाने गौरविण्यात आले. साडी व फेटा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


मीरा आव्हाड आपल्या कुटुंबीयांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भोजनालय चालवतात. शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरगुती आणि सकस अन्न मिळावे, त्यांना परवडणाऱ्या दरात दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे, या भावनेतून त्या गेल्या काही काळापासून ही सेवा करीत आहेत. दररोज सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या ताटात मायेचा घास वाढण्याचे काम त्या करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी त्यांचे भोजनालय केवळ मेस न राहता घरच्या जेवणाची उब देणारे ठिकाण बनले आहे.
मीरा आव्हाड यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे पाच वाजता होते. विद्यार्थ्यांच्या जेवणाची तयारी, स्वयंपाक, भोजनाची व्यवस्था आणि इतर कामे करीत त्या रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कार्यरत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी दररोज दोन वेळचे भोजन तयार करण्याचे आव्हान त्या कुटुंबीयांच्या मदतीने समर्थपणे पेलत आहेत. त्यांच्या हातच्या जेवणात घरगुती चव, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यांना विशेष महत्त्व दिले जाते.


शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांतून येतात. घरापासून दूर राहताना त्यांना पौष्टिक आणि परवडणारे भोजन मिळणे ही मोठी गरज असते. ही गरज ओळखून मीरा आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना अल्पदरात घरगुती भोजन देण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाची चिंता दूर झाली आहे.


सत्काराला उत्तर देताना मीरा आव्हाड यांनी आपल्या सेवेमागील भावना व्यक्त केली. “गरिबीमुळे माझ्या मुलाला उच्च शिक्षण घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उपासमार किंवा कुपोषण सहन करावे लागू नये, हीच माझी भावना आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अल्पदरात घरगुती भोजन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणात अन्नाची कमतरता अडथळा ठरू नये, या उद्देशाने मेस चालवित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मीरा आव्हाड यांच्या अथक परिश्रमांची आणि मायेने बनविलेल्या घरगुती भोजनाची विद्यार्थ्यांकडून विशेष प्रशंसा केली जाते. पहाटेपासून रात्रीपर्यंत सातत्याने काम करून शेकडो विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था सांभाळणे हे मोठे जबाबदारीचे काम आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळते आणि त्यांना घरापासून दूर असताना आपुलकीचा आधार मिळतो, याचे समाधानच आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मीरा आव्हाड यांचे म्हणणे आहे.


यावेळी ॲड. कारभारी गवळी यांनी मीरा आव्हाड यांच्या कार्याचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांना केवळ भोजन न देता त्यांच्या शिक्षणप्रवासाला शारीरिक बळ आणि मायेचा आधार देणारे मीरा आव्हाड यांचे कार्य हे लोकभक्ती आणि कर्मभक्तीचे जिवंत उदाहरण आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब पालवे, हनुमंतराव साळवे, आनंदा आढाव, अभिमान शिंदे, चतुराबाई शिंदे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *