नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टच्या कार्यकारणीला मोठा दिलासा
बदल अर्ज सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्ट एफ-17च्या कार्यकारणीबाबत पुणे येथील मा. धर्मादाय सहआयुक्तांकडे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 मधील कलम 47 अन्वये युनूस तांबटकर यांनी दाखल केलेला अर्ज क्र. 60/2016 अखेर रद्द करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर धर्मादाय सहआयुक्तांनी हा अर्ज रद्द केल्याची माहिती ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी रेहान शफी अहमद काझी यांनी शनिवारी (दि.29 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
युनुस सुलतान तांबटकर व इतरांनी सन 2016 मध्ये पुणे येथील धर्मादाय सहआयुक्तांकडे कलम 47 अन्वये नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टवर पाच वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. या अर्जाला तत्कालीन विश्वस्त तथा ट्रस्टचे माजी जनरल सेक्रेटरी तनवीर मुनीर खान व ॲड. जावेद खुदाबक्ष काझी यांनी कलम 73-अ अन्वये हरकत घेतली होती. सदर हरकत धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केली होती.
दरम्यान, युनुस सुलतान तांबटकर व इतरांनी सन 2021 मध्ये इम्रान शफी अहमद शेख यांच्या माध्यमातून अहमदनगर येथील धर्मादाय उपआयुक्तांच्या कार्यालयात अहमदनगर यांच्या कडे बदल अर्ज क्र. 1457/2021 दाखल करण्यात आला होता असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या अर्जासंदर्भातील कागदपत्रे, पुरावे व परिस्थितीची चौकशी करून संबंधित बदल अर्ज फेटाळण्यात आल्याचा दावा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
सन 2022 मध्ये नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टची निवडणूक झाल्यानंतर त्यासंदर्भातील बदल अर्ज क्र. 732/2022 अहमदनगर येथील धर्मादाय उपआयुक्तांच्या कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच कलम 47 अन्वये दाखल केलेल्या अर्जावर पुणे येथील धर्मादाय सहआयुक्तांसमोर सुनावणी झाली. दि.6 ऑगस्ट 2026 रोजी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध कागदपत्रे व त्यातील नोंदींचे अवलोकन करून धर्मादाय सहआयुक्तांनी अर्ज क्र. 60/2016 रद्द केला. तसेच रेहान शफी काझी यांनी दाखल केलेला बदल अर्ज क्र. 732/2022 पुढील सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश दिल्याचे रेहान काझी यांनी स्पष्ट केले.
यावेळी रेहान काझी यांनी युनूस तांबटकर व त्यांच्या नातेवाईकांकडून ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. ट्रस्टच्या मिळकतीमध्ये अनधिकृत बांधकाम करून गाळे उभारणे, त्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे, अवैध भाडे वसुली करणे, ट्रस्टच्या भाडेकरूंना अधिकार नसताना नोटिसा पाठवून पैशांची मागणी करणे, तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खोटे व बनावट गुन्हे दाखल करणे, असे आरोप त्यांनी केले.
ट्रस्ट संचलित शाळेतील पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून जाहीर करून त्यासंदर्भातील पत्रव्यवहार करणे व ट्रस्टच्या कार्यालयात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही काझी यांनी सांगितले.
ट्रस्टच्या मिळकतीचे कथित नुकसान व अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच तांबटकर व इतरांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि त्यांच्या माध्यमातून ट्रस्टसंदर्भात कोणतेही व्यवहार करू नयेत, असे आवाहन रेहान काझी यांनी केले. अशा व्यवहारांची जबाबदारी नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्टची राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी ॲड. वसीम गुलाम सय्यद, ॲड. नवाज खान उमरखान पठाण, विश्वस्त इनाम उल्ला खान, वाजिद खान व इफ्तेखार खान उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने ॲड. वसीम गुलाम सय्यद, ॲड. नवाज खान उमरखान पठाण व ॲड. सचिन तरटे यांनी कायदेशीर कामकाज पाहिले.

