मतदार यादीतील कथित घोळाविरोधात एल्गार; समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही आंदोलनात सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतदार यादीतून नागरिकांना कथितरीत्या चुकीच्या पद्धतीने वगळून त्यांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि मतदारांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप असलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध समविचारी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, नईम शेख, विल्सन रुकडीकर, स्वप्नील साठे, राहुल ठोकळ, अझीझ शेख, शुभम दारकुंडे, जालिंदर कानडे, लकी वाघमारे, अरबाज शेख, जमीर सय्यद, जावेद शेख, आयन शेख, नजीर देशमुख, पीटर लोंढे, फयाज शेख, रईस शेख, निखिल मगर, शाम ससाणे, तौसिफ शेख, जावेद सय्यद, जफर काझी, योगेश जावळे, फारूक शेख, प्रशांत आठवले, योहान चाबुकस्वार, चिकू गायकवाड,
महिला आघाडी आर पी आय ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, विश्रांती पठारे, प्रियंका पठारे, शीतल नाटिकर, रेश्मा जाधव, प्रमिला शिरसाठ आदी सहभागी झाले होते.
या आंदोलनास शिवसेना शहरप्रमुख ( उबाठा ) किरण काळे, माजी नगरसेवक संजय झिंजे, आंबेडकरी चळवळीतील संजय कांबळे, बंडू आव्हाड, सुजित घंघाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेखर पंचमुख यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.
मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पणाने अभिवादन करुन आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. त्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात झाली. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा नागरिकांच्या सहभागाचा मूलभूत आधार असल्याचे अधोरेखित करत आंदोलकांनी मतदार यादीच्या प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मतदार यादीतून नागरिकांची नावे वगळली जात असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रक्रियेमुळे पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाहीत, याची खात्री करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) विरोध दर्शवत रिपाइंच्या वतीने ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत पात्र नागरिकांची नावे चुकीने वगळली गेल्यास त्यांच्या मतदानाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो, अशी आंदोलकांची भूमिका आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदार यादीतील नावांबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, नागरिकांना त्यांची नावे तपासण्याची आणि आवश्यक दुरुस्ती करून घेण्याची संधी मिळावी, तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यांच्यावर कठोर कारवाई आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात सर्व समविचारी संघटना, पक्ष व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

