• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भिंगारमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

ByMirror

May 30, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक आणि समाजप्रबोधन करणारे विचारवंत होते -संजय सपकाळ

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश


स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक आणि समाजप्रबोधन करणारे विचारवंत होते -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा आणि सीए रवींद्र कटारिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि क्रांतिकारक कार्याला अभिवादन केले. यानंतर पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. उद्यानातील कचरा हटविणे, परिसर स्वच्छ करणे तसेच वाढलेली काटेरी झाडे आणि झुडपे हटवून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला. या उपक्रमातून “स्वच्छ परिसर, सुंदर परिसर” हा संदेश देण्यात आला.


पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने ॲड. सुरेंद्र कटारिया आणि शामराव पांढरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याच कार्यक्रमात एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले शामराव माधवराव पांढरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अशोक पराते, दिलीपराव ठोकळ मेजर, राजू जंगम, जहीर सय्यद, संजय ढोणे, सर्वेश सपकाळ, जालिंदर अळकुटे, दिलीपशेठ गुगळे, नवनाथ वेताळ, अभिजीत सपकाळ, सखाराम अळकुटे, भाऊसाहेब सावळे, कुमार धतुरे, योगेश चौधरी, उमाशंकर सिंह, दीपक अमृत, ताराचंद ठोकळ आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते समाजप्रबोधन करणारे विचारवंत होते. त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवून आम्ही समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम सातत्याने राबवत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, “समाजात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता आहे. वृक्ष हेच भविष्यातील जीवनाचे आधार आहेत. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे.”


सचिन चोपडा म्हणाले की, “स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या केवळ सरकारी जबाबदाऱ्या नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्याची प्रेरणा दिली जात असून युवकांनी अशा उपक्रमात पुढाकार घ्यावा.” सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. राष्ट्रप्रेमासोबत समाजहिताची भावना जोपासणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक सहभाग वाढला तर भविष्यातील पिढीसाठी चांगले वातावरण निर्माण होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *