औषधी गुणधर्म असलेल्या देशी वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रभावी संदेश
‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संकल्प; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील जिल्हा आयुष रुग्णालय परिसरात ग्रीन आर्मी कोअर कमिटीच्या वतीने वृक्षारोपण अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. या अभियानात बकुळ, आपटा, चिंच, लिंब यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाबरोबरच आरोग्यदायी परिसर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमास राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन समिती मोहिमेचे प्रा. हर्षल आगळे, जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य नगरसेवक दत्ता गाडळकर, सविताताई मोरे, वृक्षमित्र अजित कटारिया, प्रा. राजेंद्र देशमुख, ग्रीन आर्मी कोअर कमिटीचे इंजि. प्रताप काळे, संजय जोशी, बंडू पवार तसेच जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधत वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व विशद केले. केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांचे नियमित संगोपन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटत चाललेली हरित संपदा लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
रुग्णालय परिसरात लावण्यात आलेले बकुळ, आपटा, चिंच आणि लिंब यांसारखे देशी वृक्ष भविष्यात परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच औषधी, पर्यावरणीय आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. विशेषतः आयुष रुग्णालयाच्या परिसरात औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याने रुग्णालयाचे नैसर्गिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.
या अभियानासाठी महापालिकेच्या वतीने खड्डे खोदण्यासाठी जेसीबीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे वृक्षारोपणाचे नियोजन अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. ग्रीन हाऊस व वनमहोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. नाझिया शेख, डॉ. हरलीनकौर पुरी, संगीता नन्नवरे, रुग्णालयाचे सहाय्यक मेट्रन अजिंक्य पवार, वर्षा जाधव, विशाल केदारी, अश्विनी बोरगे, योगिता कदम, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, पवन शिसोदे, हर्षा फाळके, एलिझाबेथ तेलधुणे, चैतन्य निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवत पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

